मुंबई : आजकालच्या आपल्या धकाधकीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक-मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. एकाच वेळी अनेक शारीरिक व्याधी असणाऱ्या रुग्णांना वेगवेगळी औषधे द्यावी लागतात. त्याचे प्रमाणही अधिक असते. अशावेळी अनेकदा रुग्ण कंटाळून औषधे घेणे टाळतात. परिणामी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
मात्र आता रुग्णाने योग्य वेळेत औषधे घेतली की नाही, याकडे लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी संशोधन सुरु होते. या संशोधनाला यश आल्याने आता लवकरच डिजिटल टॅबलेट बाजारात येणार आहेत. अमेरिकेत या टॅबलेटला प्रशासनाची मान्यता मिळाली आहे.
हे टॅबलेट कशाप्रकारे काम करेल ?
या टॅब्लेटमध्ये एक सेन्सर लावला आहे. त्याद्वारे डॉक्टरांना रुग्णाच्या औषधांबाबत मेसेज दिले जाणार आहेत. त्यामुळे रुग्णाचे रिपोर्ट ठेवणे डॉक्टरांना सोपे होणार आहे. अमेरिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या टॅबलेटचे नाव ‘एबिलिफी मायसाईट’ असे आहे. स्क्रिझोफेनिया, बायपोलर डिसऑर्डर आणि नैराश्य या आजारांच्या रुग्णांसाठी हे टॅबलेट तयार केलेले आहे. पोटातील द्रव पदार्थांमध्ये गेल्यावर ही टॅबलेट शरीरावर परिणाम करायला सुरूवात करेल. यातून एका उपकरणाला मेसेज पाठवला जाईल. त्यानंतर हे उपकरण मोबाईलमधील अॅपद्वारे संबंधितांना मेसेज पाठवेल.
रेतीच्या कणाइतका या टॅबलेटचा आकार आहे. नैराश्यात अनेकदा रुग्ण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी हे टॅबलेट फायदेशीर ठरेल.