मुंबई : जगभराची चिंता बनलेल्या ओमायक्रोनने भारतात एन्ट्री केलीच होती. तर आता राजधानी दिल्लीत देखील ओमायक्रॉनचा रूग्ण सापडला असल्याची माहिती आहे. यापूर्वी महाराष्ट्रात देखील कल्याण डोंबिवलीमध्येही ओमायक्रॉनचा रूग्ण सापडला होता. यामुळे आता देशातील ओमायक्रॉन रूग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
महाराष्ट्र, गुजरातनंतर आता दिल्लीतही ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडलाय. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ही माहिती दिली आहे. दिल्लीतील LNJP रुग्णालयात 12 संशयित रुग्ण दाखल झाले होते. यातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या सर्वांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. यामधील एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं उघड झालंय.
धारावीमध्येही ओमायक्रोनचं सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला एक व्यक्ती धारावीमध्ये राहतो. दरम्यान या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय. या व्यक्तीचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे.
कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका ओळखता या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सध्या सुरु आहे.
राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कल्याण डोंबिवलीत (Kalyan Dombivali) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमाक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णाने परदेशी प्रवास केला होता. ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून हा रुग्ण आला होता.