दिल्ली : कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमोयक्रोन व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत भारतासह 25हून अधिक देशांमध्ये याची हा व्हेरिएंट पसरला असल्याची माहिती आहे. दरम्यान, कोविड-19च्या ओमायक्रोन प्रकाराची लागण झाल्याचा संशय असलेल्या 12 रुग्णांना आतापर्यंत दिल्लीतील लोकनायक जय प्रकाश नारायण रुग्णालयात (LNJP हॉस्पिटल) दाखल करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटच्या 8 संशयितांना 2 डिसेंबर रोजी एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच वेळी, इतर चार संशयितांना 3 डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी दाखल केलंय. त्यापैकी दोघांचा कोविड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर इतर 2 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. यासोबतच सर्व रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहेत.
आज एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 4 संशयितांपैकी दोघं जण ब्रिटनमधून परतलेत. तर एक फ्रान्स आणि नेदरलँडमधून परतला होता. यासोबतच कोविड-19ची लागण झालेल्या रुग्णांचं कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग केलं जात असून त्यांची चाचणीही केली जातेय.
गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतात ओमायक्रोन व्हेरिएंट सापडला असल्याची माहिती दिली. कर्नाटकमध्ये या व्हेरिएंटची दोन प्रकरणं आढळून आली आहेत.
कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की, 'कोविड-19च्या ओमायक्रोन प्रकाराने दोन लोकांना संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. संक्रमित आढळलेली व्यक्ती सुमारे 66 वर्षांची आहे, जो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. तर दुसरी व्यक्ती 46 वर्षीय आहे.