मुंबई : कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगाची चिंता पुन्हा एकादा वाढली आहे. जेव्हा अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी होऊ लागली, तेव्हा पुन्हा एका व्हेरिएंटमुळे दहशत निर्माण झाली आहे. हा नवीन प्रकार दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. हा व्हेरिएंट खूप वेगाने पसरतो आणि त्याचं म्यूटेशन 30 पेक्षा जास्त वेळा झालं आहे. या प्रकाराला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आहे.
संपूर्ण जग या व्हेरिएंटमुळे सावध झालाय. भारत सरकारनेही सर्व राज्यांना पत्र पाठवून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी, आरोग्य मंत्रालयाने कोविडच्या नवीन व्हेरिएंट प्रभावित देशांतून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्याच्या सूचना जारी केल्या.
यामुळे आता भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाईल. अलीकडे व्हिसावरील निर्बंध शिथिल करून आंतरराष्ट्रीय प्रवासाला सूट देण्यात आली होती, त्यामुळे त्याबाबत विशेष खबरदारी घेण्यात येतेय.
सतत म्यूटेशन होत असलेल्या या व्हेरिएंटमुळे WHO सोबतच शास्त्रज्ज्ञांचंही टेन्शन वाढलंय. म्यूटेशन म्हणजेच 30 पेक्षा जास्त वेळा रूप बदलणं ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. दुसऱ्या लाटेमध्ये, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंट्सचे असंच म्यूटेशन झालं आणि ते घातक ठरले.
सर्वात चिंतेची बाब म्हणजे सध्याची लस या प्रकाराविरूद्ध प्रभावी आहे की नाही, याचा अभ्यास केला जातोय. या अभ्यासाला वेळ लागू शकतो. अशा स्थितीत तोपर्यंत या प्रकाराने कहर केला तर ती अजून चिंतेची बाब ठरू शकते.
दरम्यान, WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत या नवीन व्हेरिएंटवर चर्चा होणार आहे. WHO च्या म्हणण्याप्रमाणे, या प्रकारावर अधिक संशोधन आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अधिकाधिक लोकांना कोरोनाची लस मिळवून देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे.
या नवीन व्हेरिएंटबद्दल अधिक चिंता आहे कारण तो किती वेगाने पसरू शकतो, हे अद्याप माहित नाही. जी माहिती समोर आली आहे ती फक्त या प्रकारातील म्यूटेशनची आहे.