१० नक्षलवाद्यांना कंठस्नान, छत्तीसगड-तेलंगणा पोलिसांचं जॉईंट ऑपरेशन

छत्तीसगडमधल्या नक्षल प्रभावित भाग असलेल्या विजापूर जिल्ह्यात १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Mar 2, 2018, 01:13 PM IST
१० नक्षलवाद्यांना कंठस्नान, छत्तीसगड-तेलंगणा पोलिसांचं जॉईंट ऑपरेशन title=

रायपूर : छत्तीसगडमधल्या नक्षल प्रभावित भाग असलेल्या विजापूर जिल्ह्यात १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. छत्तीसगड-तेलंगणा पोलिसांनी केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये या नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. पामेड आणि उसूरच्या मध्य पुजारी कांकेर गावातल्या जंगलामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा झाला.

छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांना या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

दोन्ही राज्यांचे पोलीस जंगलामध्ये घुसले तेव्हा नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करायला सुरुवात केली. काही वेळ गोळीबार झाल्यावर नक्षलवादी तिकडून फरार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. गोळीबार थांबल्यावर पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं, तेव्हा पोलिसांना १० नक्षलवाद्यांचं पार्थिव सापडलं. या सगळ्या १० नक्षलवाद्यांची ओळख पटली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या या चकमकीमध्ये एक पोलीसही जखमी झाला आहे. सकाळी ६.३० वाजता ही चकमक झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.