मुंबई : शिक्षणाला वयाचं बंधन नसतं. तुमची जिद्द असेल तर तुम्ही वयाच्या शंभरीनंतरही शिक्षण घेऊ शकता हे केरळातील भागीरथी अम्माने अधोरेखित केलं आहे. वय हे तर फक्त आकडे आहेत असं म्हणत अम्माने शिक्षणाचं महत्व पुन्हा एकदा समोर आलं आहे.
केरळात राहणाऱ्या 105 वर्षीय भागीरथी अम्माने चौथीची परीक्षा पास होऊन जगासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. अम्मांना कायमच शिक्षणाची ओढ होती. सतत काहीना काही शिकत राहायचं याकडे त्यांचा कल असायचा. राज्य साक्षरता मिशन अंतर्गत ही परीक्षा दिली आहे.
आईच्या निधनानंतर अम्माला आपलं शिक्षणाचं स्वप्न दूर करावं लागलं. आईच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अम्मावर आली. यामुळे त्या आपलं शालेय शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. आईच्या निधनानंतर त्यांनी आपल्या भावंडांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांची जबाबदारी स्विकारली.
त्यानंतर लग्नानंतर शिक्षण पूर्ण करण्याचा विचार करणाऱ्या अम्माचं हा विचार देखील अर्धवट राहिलं. वयाच्या 30 व्या वर्षी अम्माच्या पतीचं निधन झालं. यानंतर मुली आणि 2 मुलगे अशा कुटुंबाची संपू्र्ण जबाबदारी अम्माच्या खांद्यांवर आली. यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही.
पण शिकण्याची जिद्द काही त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांच्या या जिद्दीने त्यांच्याच वयाला देखील मागे टाकलं आहे. वयाच्या 105 वर्षे गाठलेल्या भागीरथी अम्माने चौथीची परीक्षा देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सर्वात ज्येष्ठ विद्यार्थी असणाऱ्या अम्मा या पहिल्याच असतील असा दावा केला जात आहे.
96 व्या वर्षी भागीरथी अम्माने साक्षरता अभियानात सहभाग घेऊन प्राथमिक परीक्षा दिली यावेळी त्यांना 100 पैकी 98 गुण मिळाले. 105 वर्षीय अम्माकडे आधारकार्ड नसल्यामुळे त्यांना पेन्शन अथवा ज्येष्ठ नागरिक सुविधा मिळत नाहीत. आता शिक्षण घेतल्यानंतर त्या याकडे लक्ष देणार आहेत.