Shocking News : सध्या स्मार्टफोन (Smartphone) हा तरुणाईच्या शरीराचा अविभाज्य भाग आहे की काय असे वाटायला लागलं आहे. तरुणाई प्रत्येक ठिकाणी मोबाईल घेऊनच वावरताना दिसते. मुला मुलींना रात्री झोपेतही उशीच्या शेजारी किंवा बाजूलाच मोबाईल लागतो. मात्र या मोबाईलचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. अनेकदा या मोबाईल फोनमुळे काही जणांना जीव देखील गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशात देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. चार्जिंगला (mobile charging) लावलेल्या फोनमुळे 16 वर्षाच्या मुलीचा जीव गेला आहे.
उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. मोबाईल चार्जिंगला लावणे मुलीला महागात पडले आहे. मोबाईल फोन चार्जिंगला लावताना विजेचा धक्का लागल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजेच्या धक्क्यामुळे मुलगी गंभीररित्या भाजली आहे. या भीषण अपघातात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बांदा जिल्ह्यातील अटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महोत्रा गावात राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीने मोबाईल चार्जिंगला लावण्यापूर्वी तिने विजेचे बटण सुरु केले होते. त्यानंतर फोन चार्जिंगला लावला. याचदरम्यान तिला विजेचा धक्का बसला आणि गंभीररित्या भाजली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नातेवाईकांनी शवविच्छेदन न करता मुलीचा मृतदेह घरी आणला. अचानक हाताला विजेचा धक्का बसल्याने ती गंभीररित्या भाजून जखमी झाली होती.
घरच्यांसमोर विजेचा धक्का लागल्याने मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तिला वाचवता आले नाही. डोळ्यांसमोर मुलीचा मृत्यू झाल्याचे पाहून कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. मुलीच्या मृत्यूने कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ती पाच बहिणी आणि दोन भावांमध्ये मोठी होती. नुकतीच ती दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. मृत मुलीचे वडील हे मजुरीचे काम करतात. घरच्यासमोरच मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कराड उंडाळे येथे मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट...
साताऱ्यातील कराड उंडाळे येथे एका मोबाईल शॉपीत बॅटरीचा स्फोट झाला आहे. मोबाईल दुरुस्त करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने मोबाईल दिल्यानंतर बॅटरी खोलून पाहण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात बॅटरीचा भीषण स्फोट झाला. ग्राहकांने ती बॅटरी खोलण्याचा प्रयत्न केला असता बॅटरीचा स्फोट झाला. दुकानात स्फोट झाल्याने दुकान मालकासह ग्राहकांची तारांबळ उडाली. मात्र या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण अशा प्रकारे मोबाईल बॅटरी हातळल्याने त्याचा स्फोट होवू शकतो हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.