नवी दिल्ली : सुरू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतच आर्थिक वृद्धी दराची (जीडीपी) घसरण होऊन तो ५.७ वर आला आहे. 'ही घसरण ही चिंतेची बाब आहे. यामुळे भविष्यात अर्थव्यवस्थेसमोर आव्हान उभे राहील', असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय सांख्यकी विभागाकडून सुरू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा अहवाला प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर जेटली बोलत होते. या वेळी बोलताना जेटली म्हणाले, 'जीडीपीची घसरण सावरण्यासाठी येणाऱ्या तिमाहीत निती आणि निर्देश अशा दोन्ही पातळींवर काम करावे लागेल. जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक सुधारणा होत आहे. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देत देशांतर्गत गुंतवणूक झाली पाहिजे. तसेच, महसूली गुंतवणूकही सकारात्मक व्हायला हवी. सेवा क्षेत्रातील सुधारणा आणि वस्तू सेवा कर (जीएसटी) याचा परिणामही जीडीपीवर काही प्रमाणात झाला आहे', असेही जेटली यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्योग संघटना फिक्कीने घसरलेल्या जीडीपीवर प्रतिक्रीया दिली आहे. ही प्रतिक्रीया देताना 'जीडीपीचे घसरलेले आकडेच सांगत आहेत की, कृषी आणि उत्पादन क्षेत्रात मंदी आली आहे. तसेच, देशात जीएसटी लागू केल्यामुळे निर्माण झालेली अनिश्चितताही जीडीपीच्या घसरणीस कारणीभूत ठरली आहे. दरम्यान, येत्या काळात जीडीपी पुन्हा उभारी घेईल', असेही फिक्कीने म्हटले आहे.