UCO बँकेने तात्काळ पेमेंट सेवेद्वारे (UCO Bank IMPS सेवा) काही खात्यांमध्ये चुकून 649 कोटी जमा केले होते. यामधील 79 टक्के रक्कम बँकेकडून वसूल करण्यात आली आहे. युको बँकेने यासंदर्भात शेअर बाजारात माहिती देत सांगितलं आहे की, वेगवेगळी पावलं उचलत बँकेने पैसे जमा झालेली खाती गोठवली आहेत. 820 कोटींपैकी 649 कोटी रुपये वसूल केले असल्याची माहिती बँकेने दिली आहे. ही एकूण रकमेच्या सुमारे 79 टक्के आहे. दरम्यान बँकेने आता उर्वरित 171 कोटी वसूल करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कायदेशीर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांनाही माहिती देण्यात आली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने अद्याप हा तांत्रिक बिघाड होता, मानवी चूक होती की हँकिंगचा प्रयत्न हे स्पष्ट केलेलं नाही. IMPS प्लॅटफॉर्म नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे ऑपरेट केले जाते.
युको बँकेच्या ग्राहकांना बुधवारी तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत होता. यामुळे खातेदार आयएमपीएसच्या मार्फत कोणताही व्यवहार करु शकत नव्हते. यानंतर बँकेने काही काळासाठी आयएमपीएसच्या मार्फत पेमेंट करण्याची सुविधा बंद केली होती. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर मात्र देखभालीसाठी ही सेवा सध्या उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे.
बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे इतर बँकांमार्फत युको बँकेत पैसे भरले असता पैसे खात्यातून जात होते, मात्र बँकेत जमा होत नव्हते.
IMPS म्हणजे तात्काळ पेमेंट सेवा आहे. याच्या माध्यमातून इंटरनेट आणि फोन बँकिंगद्वारे त्वरित पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची सुविधा मिळते. रिअल टाइम व्यवहारांमुळे, बहुतेक लोक या सुविधेचा वापर करतात. IMPS द्वारे, खातेदार एका खात्यातून एका दिवसात जास्तीत जास्त 5 लाख रुपये पाठवू शकतो.