भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट सुधारला; आतापर्यंत ९५ हजारहून अधिक रुग्ण बरे

 वाढणाऱ्या संख्येसह एक दिलासादायक बाबही समोर येत आहे.

Updated: Jun 2, 2020, 05:11 PM IST
भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट सुधारला; आतापर्यंत ९५ हजारहून अधिक रुग्ण बरे
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. परंतु वाढणाऱ्या संख्येसह एक दिलासादायक बाबही समोर येत आहे. कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट 48.07वर पोहचला आहे. तर देशभरात 95 हजार 527 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. 

आपल्या देशात मृत्यूचं प्रमाण 2.82 टक्के इतकं आहे, जे जगातील सर्वात कमी मृत्यूचं प्रमाण आहे. सर्व राज्यांना आपापल्या राज्यातल्या रुग्णांचं, कोरोना प्रकरणांचं विश्लेषण करण्यास सांगितलं आहे. एखाद्या राज्यात त्यांना तात्पुरतं COVID-19 केअर सेंटर स्थापित करण्याची आवश्यकता वाटत असल्यास, त्यांनी केअर सेंटर स्थापित करणं आवश्यक असल्याचंही लव अग्रवाल यांनी सांगितलं.

देशात 1 जूनपासून 476 सरकारी टेस्टिंग लॅब आणि 205 खाजगी लॅब वाढवण्यात आल्या आहेत. देशभरात दररोज 1 लाख 20 हजार टेस्ट होत आहेत. 

'कम्युनिटी ट्रान्समिशन' या शब्दाचा वापर करण्याऐवजी आपल्याला रोगाचा प्रसार किती आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आम्ही या रोगाच्या पीक पॉईंटपासून बरेच दूर आहोत. रोगाला आळा घालण्यासाठी होणारे उपाय प्रभावी आहेत. मृत्यू दर कमी होण्याचं भारतील प्रमाण चांगलं असल्याचं, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMRच्या निवेदिता गुप्ता यांनी सांगितलं आहे. 

देशात कोरोनाबाधितांचा आकडा 1,98,706 वर पोहोचला आहे. तर, आतापर्यंत या व्हायरसमुळे 5,598 जणांचा मृत्यू झाला आहे.