उत्तर प्रदेशात 17 वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या मित्राची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मेरठ येथे ही घटना घडली असून विद्यार्थ्याने डोक्यात वार करुन मित्राची हत्या केली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. विद्यार्थ्याने आपण हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसंच अभिनवने आपल्या मोबाईलमधून आपल्या प्रेयसीचे काही फोटो, व्हिडीओ चोरले होते आणि त्याच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत होता असा दावा केला आहे.
अभिनव आणि आरोपी विद्यार्थी हे 11 वी आणि 12 वीचे विद्यार्थी होते. तसंच दोघेही शेजारी होते. इंजिअरिंगच्या प्रवेश परिक्षेसाठी ते दोघे तयारी करत होते. दोघेही 15 किमी दूर असणाऱ्या कोचिंग सेंटरमध्ये एकत्र जात असत. अभिनन बाईक चालवत असे आणि त्याचा मित्र मागे बसत असे.
शनिवारी रात्री दोघेही एकत्र कोचिंग सेंटरमधून निघाले होते. पण अभिनव रात्री उशिरापर्यंत आला नव्हता. त्याच्या पालकांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने अभिनव कुठे गेला हे आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं. यानंतर अभिनवचे वडील सुनील कुमार यांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. आपला आरोपीवर संशय असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं.
पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं आणि सीसीटीव्ही फुटेज तपासलं. सीसीटीव्ही दोघेजण एकत्र दिसत होते. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपी विद्यार्थ्याने आपला गुन्हा कबूल केला.
आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या फोनमध्ये त्याच्या प्रेयसीचे काही व्हिडीओ होते. अभिनवने ते व्हिडीओ पाहिले होते आणि आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करुन घेतले होते. यानंतर त्याने माझ्या प्रेयसीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. आपल्यासोबत बाहेर फिरायला चल असं तो तिला सांगत असे. जेव्हा आरोपीच्या प्रेयसीने त्याला हा सगळा प्रकार सांगितला तेव्हा त्याने अभिनवच्या हत्येचा कट आखला.
शनिवारी आरोपीने अभिनवला, मला माझा फोन विकायचा आहे असं सांगितलं. दोघेही एकत्र मोबाईल शॉपमध्ये गेले आणि 8 हजारात मोबाईल विकला. यानंतर दोघे रेस्तराँमध्ये जेवण्यासाठी गेले. तेथून परतत असताना ते रस्त्यात थांबले. यावेळी अचानाक आरोपीने आपल्या बॅगेतून हातोडा काढला आणि अभिनवच्या डोक्यात घातला. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, अभिनव खाली कोसळल्यानंतरही मी त्याच्या डोक्यात हातोडा मारत होतो.
पोलिसांनी रविवारी अभिनवचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे सोपवला. अभिनवच्या नातेवाईकांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याची भूमिका घेतली. नातेवाईकांचं म्हणणं आहे की, आरोपी एकटाच अभिनवची हत्या करु शकणार नाही. मुख्य आरोपीला अटक करत आम्हाला न्याया द्यावा.
"पोलिसांनी आमची दिशाभूल करु नये. त्यांनी यात कोणकोणाचा सहभाग आहे हे आम्हाला सांगावं. आमच्या मुलासोबत काय झालं हे आम्हाला समजलं पाहिजे," असं अनुभवचे नातेवाईक कुलदीप यांनी म्हटलं आहे.
"आरोपीने सांगितलं आहे की, त्याच्या फोनमध्ये त्याचे आणि प्रेयसीचे काही व्हिडीओ होते. अभिनवने हे व्हिडीओ चोरले होते. यामुळे नाराज होऊन त्याने हा कट आखला होता. आम्ही मृतदेह मिळला असून, हत्येसाठी वापरलेला हातोडाही मिळवला आहे. तो अल्पवयीन असून, त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. या गुन्ह्यात अजून कोणाचा सहभाग आहे का याची माहिती घेण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही तपासणार आहोत. कुटुंब गुन्ह्यात सहभागी सर्वांना शिक्षा देण्याची आणि न्याय देण्याची मागणी करत आहेत," असं मेरठ शहराचे पोलीस अधिक्षक आयुष विक्रम सिंग यांनी सांगितलं आहे.