प्रत्येक गुंतवणूकदारामागे 5 वर्षं; कोर्टाने सुनावली तब्बल 170 वर्षांची शिक्षा, सोबतच ठोठावला लाखोंचा दंड

मध्य प्रदेशातील कोर्टाने चिट फंड कंपनी साई प्रसादचा संचालक बालासाहेब भापकर याला तब्बल 170 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 25, 2023, 06:17 PM IST
प्रत्येक गुंतवणूकदारामागे 5 वर्षं; कोर्टाने सुनावली तब्बल 170 वर्षांची शिक्षा, सोबतच ठोठावला लाखोंचा दंड title=

मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय सुनावताना फसवणुकीमधील आरोपीला तब्बल 170 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच 9 लाख 35 हजारांचा दंड ठोठावला आहे. सहाय्यक जिल्हा अभियोग अधिकारी प्रमोद अहिरवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे की, न्यायाधीश संजय कुमार शाही यांच्या कोर्टाने चिटफंड कंपनी साई प्रसाद कंपनीचे संचालक बाळासाहेब भापकर यांना आयपीसी कलम 420 आणि चिटफंड कायद्यानुसार गुंतवणुकदरांच्या संख्येनुसार 5-5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा एकूण 170 वर्षांची होत आहे. 

याप्रकरणी फिर्यादी दयारामने गोपालपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपलं कुटुंब आणि गावातील लोकांनी 2012 ते 2015 दरम्यान साईप्रसाद कंपनीत गुंतवणूक केली होती. 5 वर्षांनी हे पैसे दुप्पट होणार होते. पण जेव्हा ते कंपनीच्या कार्यालयात गेले तेव्हा ते बंद होतं. यावेळी त्यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात आलं अशी माहिती त्याने दिली आहे. 
यानंतर पीडितांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. कंपनीचा संचालक बाळासाहेब भापकर याने आपली 1 कोटी 40 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली. 

याचप्रकरणी कोर्टाने ऐतिहासिक निर्णय सुनावताना कंपनीचा संचालक बाळासाहेब भापकर याला तब्बल 170 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. आयपीसी कलम 420 आणि चिटफंड कलमनुसार प्रत्येक गुंतवणुकदाराच्या मागे 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. हे वर्षं मोजण्यात आले असता 170 वर्षं झाली आहेत. 

याआधीही कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणी कंपनीचा संचालक बाळासाहेब भापकर याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. कंपनीची संपत्ती जप्त करुन ते पैसे गुंतवणूकदारांना परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे.