नियतीचा अजब खेळ! दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलाला पाहण्यासाठी निघालेलं कुटुंबही अपघातात ठार

तेलंगणामधील नालगोंदा येथे धुक्यामुळे दुचाकीने दिलेल्या धडकेत 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान यानंतर त्याला भेटण्यासाठी निघालेल्या कुटुंबातील तिघेजण अपघातात ठार झाले.   

शिवराज यादव | Updated: Dec 25, 2023, 06:32 PM IST
नियतीचा अजब खेळ! दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलाला पाहण्यासाठी निघालेलं कुटुंबही अपघातात ठार title=

तेलंगणातील नालगोंदा जिल्ह्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दोन रस्ते अपघातांमध्ये एकूण पाचजण ठार झाले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे दृश्यमानता कमी असून त्यामुळेच हे अपघात झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पहिला अपघात झाला. यामध्ये दुचाकीने पादचाऱ्याला उडवलं होतं. या अपघातात दोनजण ठार झाले होते. 

28 वर्षीय नागराजू दुचाकी चालवत होता. तर 19 वर्षीय रामवत केशवर हा रस्त्यावरुन चालत होता. नागराजू भरधाव वेगात असताना त्याने रामवतला धडक दिली. अपघात इतका जबरदस्त होता की, दोघेही जागीच ठार झाले होते. 

रामवत केशवरचं कुटुंबही ठार

रामवत केशवरचा अपघात झाल्याची माहिती मिळताच कुटुंब त्याला भेटण्यासाठी रवाना झालं होतं. आपल्या गाडीने हे कुटुंब घटनास्थळी निघालेलं असतानाच पार्वतीपुरम येथे तेलाच्या टँकरने त्यांच्या कारला धडक दिली. धुकं असल्यामुळे ही धडक झाली. 

दरम्यान अपघात झाला तेव्हा कारमधून एकूण सातजण प्रवास करत होते. अपघातात तीनजण जागीच ठार झाले. तर चौघांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची ओळख रामवत पंडू (40), रामवंत गण्या (40) आणि रामवत बुज्जी (38) अशी पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

मृत्यू झालेले पाचजण मल्लेवानी कुंता थांडा गावातील आहेत. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मिर्यालागुडा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.