राजधानी दिल्लीत पोहोचला करोनाचा नवा व्हेरियंट, देशातील रुग्णसंख्या 110 वर; महाराष्ट्रात काय स्थिती?

करोनाचा नवा व्हेरियंट राजधानी दिल्लीतही दाखल झाला आहे. दिल्लीत ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंट जेएन.1 चं पहिलं प्रकरण समोर आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 27, 2023, 08:18 PM IST
राजधानी दिल्लीत पोहोचला करोनाचा नवा व्हेरियंट, देशातील रुग्णसंख्या 110 वर; महाराष्ट्रात काय स्थिती? title=

करोनाचा नवा व्हेरियंट जेएन.1 ची नवी प्रकरणं सतत समोर येत आहेत. आता हा व्हेरियंट राजधानी दिल्लीतही दाखल झाला आहे. दिल्लीत ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंट जेएन.1 ची लागण झालेला पहिला रुग्ण सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेल्या करोनाच्या तीन नमुन्यांपैकी एक नवा व्हेरियंट जेएन.1 आणि दोन ओमिक्रॉनचे आहेत. यासह देशातील आता नव्या व्हेरियंटचे एकूण 110 रुग्ण झाले आहेत. 

दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं आहे की, दिल्लीत ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंट जेएन.1 चं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी 3 नमुने पाठवण्यात आले होते. यामधील एक जेएन.1 आणि दोन ओमिक्रॉनचे आहेत. 

भारतात गेल्या 24 तासात करोनाच्या 529 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. आता देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 4093 झाली आहे. मंत्रालयाने बुधवारी सकाळी 8 वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासात करोनाच्या 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोन रुग्ण कर्नाटक आणि एक रुग्ण गुजरातचा आहे. यादरम्यान करोनाचा उपप्रकार जेएन.1 च्या 40 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. संध्याकाळी दिल्लीत एक रुग्ण सापडल्याची माहिती देण्यात आली. यासह 26 डिसेंबरपर्यंत देशभरात नव्या व्हेरियंटची रुग्णसंख्या 110 वर पोहोचली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, करोनाच्या नव्या उपप्रकाराचे गुजरातमध्ये 36, कर्नाटकात 34, गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान-तामिळनाडूत प्रत्येकी 4, तेलंगणात 2 आणि दिल्लीत 1 रुग्ण आहेत.