Bihar Journalist Murder: बिहारमध्ये (Bihar) एका पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विमल कुमार यादव (Vimal Kumar Yadav) अशी या पत्रकाराची ओळख पटली आहे. विमल कुमार यादव यांची त्यांच्याच घऱात घुसून हत्या करण्यात आली. 18 ऑगस्टला सकाळी ही घटना घडली. चार अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस तपास करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, अररिया जिल्ह्यातील रानीगंज येथे विमल कुमार यादव यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या घरात चारही हल्लेखोर घुसले. यावेळी विमल यादव झोपलेले होते. हल्लेखोरांनी आधी त्यांना झोपेतून उठवलं, नंतर गोळ्या घालत ठार केलं. विमल यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. छातीत गोळी लागल्याने त्यांनी जागीच प्राण सोडला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात गोंधळ उडाला होता. लोकांनी सर्वात आधी रानीगंज येथे गदारोळ केला, नंतर हे सर्वजण शवविच्छेदन केलं जाणाऱ्या ठिकाणीही दाखल झाले होते. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधिक्षकांसह खासदारही पोहोचले आहेत.
विमल यादव यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीने आरडाओरड करत लोकांना मदतीसाठी बोलावलं. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस पोहोचले होते. पोलिसांनी विमल यादव यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह अररिया सदर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
#WATCH | " It's an unfortunate incident...I have told officers to look into it...", says Bihar CM Nitish Kumar on the murder of Journalist in Araria https://t.co/7zNL6yi9bL pic.twitter.com/WSluebjGKH
— ANI (@ANI) August 18, 2023
मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असता पत्रकारांनी गर्दी केली होती. याशिवाय स्थानिक नेत्यांसह मोठे पोलीस अधिकारीही पोहोचले होते. हल्लेखोरांना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस सध्या परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. तसंच हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
दरम्यान विमल यादव यांच्या हत्येनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. खासदार चिराग पासवान यांनी राज्य सरकारवर टीका केली असून राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.