पंजाबमध्ये कबड्डी खेळाडूच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. कपूरथला जिल्ह्यात 22 वर्षीय कबड्डी खेळाडूची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हल्लेखोरांनी तलवारीने खेळाडूवर हल्ला केला, यानंतर त्याला जखमी अवस्थेत घऱाबाहेर फेकून दिलं. खेळाडूच्या वडिलांनी दरवाजा उघडला असता हल्लेखोरांनी त्यांना 'मार दिया तुम्हारा शेर बेटे को' असं म्हणाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कबड्डी खेळाडू आणि हल्लेखोरांमध्ये वाद होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
ढिलावा परिसरात ही घटना घडली आहे. कपूरथलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजपाल सिंह सिंधू यांनी सांगितलं आहे की, या हल्ल्यात एकूण सहा आरोपी होती. पोलिसांनी तपासासाठी अनेक पथकं तयार केली आहेत. या पथकांनी छापेमारी करत दोन आरोपींना अटक केली आहे. अंतर्गत वाद आणि शत्रुत्वातून बुधवारी रात्री हरदीप सिंहची तलवार आणि धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर आरोपींनाही लवकरच पकडलं जाणार आहे. पोलिसांनी ढिलवां पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हरदीपचे वडील गुरनाम सिंह यांनी पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पाच ते सहा लोक त्यांच्या घरी आले आणि दरवाजा ठोठावला. यावेळी आम्ही तुझ्या मुलाला ठार केलं आहे असं ते ओरडत होते. मी दरवाजा उघडला असता मुलगा गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला होता. त्याला जालंधरच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असून, आम आदमी पक्षाला लक्ष्य केलं आहे. ही एकमेव घटना नसून, पंजाबमध्ये 'जंगलराज' कायम असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांना पदावरुन हटवलं जावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
Shocked to learn about the brutal killing of a young Kabaddi player at vill Dhilwan in Kapurthala. See the level of fearlessness of the murderers; they knocked at the door and told the parents: "Aah maar ditta tuhada Sher putt". This isn't an isolated incident. There is complete… pic.twitter.com/myulUOWFvJ
— Sukhbir Singh Badal (@officeofssbadal) September 22, 2023
बादल यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं आहे की "कपूरथलामधील ढिलवां येथे एका तरुण खेळाडूची निर्दयीपणे हत्या झाल्याचं ऐकल्यानंतर मला धक्का बसला आहे. हल्लेखोर किती निर्भय आहेत हे यातून दिसत आहे. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि आई-वडिलांना सांगितलं की, 'आम्ही तुमच्या मुलाला ठार केलं आहे'. ही काही एकमेव घटना नाही. येथे पूर्णपणे 'जंगलराज' आहे".
"पंजाबमध्ये हत्या, चोरी, दरोडा या आता नेहमीच्या गोष्टी झाल्या आहेत. भगवंत मान राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात असमर्थ ठरत आहेत हे सत्य आहे. त्यांनी अजिबात वेळ न दवडता पद सोडलं पाहिजे," अशी मागणी बादल यांनी केली आहे.