गाजियाबादमध्ये 55 वर्षीय पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पतीने पत्नीच्या हत्या केल्यानंतर 4 दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. अखेर मृतदेह कुजू लागल्यानंतर घरातून दुर्गंध येऊ लागला होता. यानंतर आरोपी भारत सिंग आपल्या घरासमोर बसला आणि जोरजोरात आरडाओरड करु लागला. आपण पत्नीची हत्या केली असल्याचं तो ओरडत सांगत होता. तसंच शेजाऱ्यांना पोलिसांना बोलावण्यास सांगत होता.
गाजियाबादमधील एका भाड्याच्या घऱात हा सगळा प्रकार घडला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी नरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये 51 वर्षीय सुनिता यांचा मृतदेह आढळला आहे. "शेजाऱ्यांनी आम्हाला फोन करुन भारतने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली असल्याची माहिती देण्यात आली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता घरात मृतदेह पडलेला होता. तीन दिवसांपूर्वी सुनिता यांची हत्या झाल्याचं दिसत होतं. आम्ही आरोपीला अटक केली आहे. कौटुंबिक कारणावरुन वाद झाल्याने आपण पत्नीची हत्या केल्याचं त्याने चौकशीतून सांगितलं आहे. आम्ही महिलेच्या कुटुंबाला कळवलं असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे," अशी माहिती नरेश कुमार यांनी दिली आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान या घटनेमुळे शेजाऱ्यांनाही धक्का बसला असून, एकच खळबळ उडाली आहे. चार दिवसांपासून मृतदेह घरात पडलेला असताना, आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती असं त्यांनी सांगितलं आहे. जोपर्यंत आरोपी भारत सिंगने सर्वांना ओरडून पत्नीची हत्या केल्याचं सांगितलं नाही तोपर्यंत आम्हाला काहीच माहिती नव्हतं असं ते म्हणाले आहेत. त्यानेच आम्हाला पोलिसांकडे आत्मसमर्पण करायचं आहे असं सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. "मृतदेह 4 ते 5 दिवसांपासून घऱात होता. पोलीस आले आणि मृतदेह ताब्यात घेतला," असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान एका शेजाऱ्याने कशाप्रकारे आरोपी भारत सिंग घऱाबाहेर बसला होता आणि येणा जाणाऱ्या प्रत्येकाला आपण पत्नीची हत्या केल्याचं सांगत होता याची माहिती दिली. "नेमकं काय झालं हे आम्हाला माहिती नाही. तो बसून ओरडत होता. मी माझ्या पत्नीला मारलं आहे, मला अटक करा असं तो ओरडत होता. त्यामुळे आम्ही पोलिसांना बोलावलं. यानंतर घरात मृतदेह आढळला. याशिवाय आम्हाला जास्त काही माहिती नाही," अशी माहिती शेजाऱ्याने दिली आहे.