उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथे 23 दिवसांनी एका तरुणीचा दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुलीच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. हत्येचा खुलासा होताच पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. तपासादरम्यान उघड झालं की, आरोपी आपल्या प्रेयसीवर शंका घेत असे. याच संशयातून त्याने गळा दाबून प्रेयसीची हत्या केली.
जहानाबाद पोलीस ठणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. येथे राहणारी जाकिरा आपल्या कुटुंबासह नेपाळमध्ये मजुरी करण्यासाठी गेली होती. दरम्यान जाकिराची मुलगी शिरी पिलीभीतमध्ये आपल्या आजी आजोबांसह राहत होती. 13 एप्रिलला शिरीचा संशयस्पदरित्या मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी 14 एप्रिलला तिचा मृतदेह दफन केला होता.
मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आई, वडील घरी पोहोचले तेव्हा त्यांना शिरीचा मृतदेह दिसला नाही. कारण तोपर्यंत तिचा मृतदेह दफन करण्यात आला होता. यारम्यान कुटुंबीयांच्या हाती शिरीचा मोबाईल लागला. पण मोबाईल त्यावेळी बंद होता. यानंतर मोबाईल दुरुस्त कऱण्यात आला. मोबाईल सुरु झाल्यानंतर त्यामध्ये मुरादाबाद येथील शिपाई राजकुमार आणि त्याच्या प्रेयसीचा फोटो दिसला. राजकुमारची प्रेयसी शिरीची मैत्रीण होती.
यानंतर कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार राजकुमार याच्यासह प्रेयसी आणि अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला. यानंतर तरुणीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदनात गळा दाबल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचं उघड झालं.
पोलिसांनी तपास सुरु केला असता धक्कादायक खुलासे झाले. शिरीच्या हत्येसाठी जबाबदार धरलेला राजकुमार निष्पाप निघाला. गावातील मोहम्मद साहिम याने ही हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद साहिम आणि शिरी यांच्यात प्रेमसंबंध होते. 12 एप्रिलच्या रात्री शिरीने त्याला भेटायला बोलावलं होतं. पण तो वेळेआधीच पोहोचला होता. यावेळी त्याने इतर दोन तरुणांनी शिरीच्या घरातून निघताना पाहिलं. यावरुन साहिम आणि शिरी यांच्यात वाद झाला. यानंतर त्याने संतापाच्या भरात गळा दाबून शिरीची हत्या केली.
पोलिसांनी मोबाईल रेकॉर्ड तपासला असता आरोपी आणि तरुणीमधील प्रेमसंबंध उघड झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.