20 वर्षीय अर्जुन तन्वरला सर्वजण प्रामाणिक, शांत आणि एक चांगला मुलगा म्हणूनच सगळे ओळखत होते. दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या अर्जुन तन्वरची बॉक्सर होण्याची इच्छा होती. पण बुधवारी त्याला आपले आई-वडील आणि मोठ्या बहिणीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीच्या देवळी गावात ही घटना घडली आहे.
अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अर्जुनची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आपले आई वडील सतत बहिणीची बाजू घेत असून, बॉक्सिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा देत नव्हते. यामुळेच आई-वडिलांच्या 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाला त्यांच्या हत्येचा कट आखला असं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान अर्जुनचे प्रशिक्षक मनोज कलोसिया यांनी कुटुंब त्याच्या बॉक्सिंगच्या विरोधात होतं असं काही दिसत नसल्याचं म्हटलं आहे. मनोज हे मागील 8 महिन्यांपासून अर्जुनला बॉक्सिंगचं प्रशिक्षण देत आहेत. कॉलेजमध्ये बॉक्सिंग रिंग नसल्याने अर्जुन त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत होता. त्यांना जेव्हा त्याला अटक झाल्याचं समजलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. "अर्जुन राज्यस्तरीय स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला येथे आणलं होतं. अर्जुनमध्ये चांगला बॉक्सर होण्याची क्षमता दिसत असल्याने त्यांनी मला त्याला प्रशिक्षण देण्याची विनंती केली होती. कुटुंबाने त्याला परावृत्त केलं असं कधी वाटलं नाही," असं मनोज यांनी सांगितलं आहे.
पण अर्जुन मागील आठ महिन्यांपासून ट्रेनिंगसाठी आला नव्हता असंही त्यांनी सांगितलं आहे. "त्याची काही वैयक्तिक कामं असतील किंवा कॉलेजमध्ये व्यग्र असेल असा विचार करुन आम्ही जास्त माहिती घेतली नाही," असं ते म्हणाले आहेत.
दिल्ली विद्यापीठाच्या मोतीलाल नेहरू महाविद्यालयात (संध्याकाळ), अर्जुन हा बीए राज्यशास्त्राचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. त्याला स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश मिळाला होता. मात्र त्याची शैक्षणिक कामगिरी खराब होती. कॉलेज रेकॉर्डवरून असं दिसून आलं आहे की तो त्याच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये नापास झाला, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये परीक्षेचा प्रयत्न केला नाही आणि तिसऱ्या सेमिस्टरसाठी परीक्षेचा फॉर्म भरला नाही.
रेकॉर्डनुसार, धौला कुआन येथील आर्मी पब्लिक स्कूलमधून त्याने बारावीत 59 टक्के गुण मिळवले. "त्याच्या महाविद्यालयातील रेकॉर्डनुसार, तो शैक्षणिकदृष्ट्या चांगली कामगिरी करत नव्हता. तो कदाचित गेल्या वर्षीपासून कशाचा तरी सामना करत होता. पण आम्हाला त्याबद्दल माहिती नाही," असं प्राचार्य विचारा म्हणाले.
अर्जुनचे बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित केल्याने त्याचं कौतुकही होत होतं. महाविद्यालयातील त्यांचे क्रीडा प्रशिक्षक अमित तोमर म्हणाले की तो “चांगला वागणारा आणि आदर करणारा” होता. “सामान्यतः, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला क्रीडा कोट्यात प्रवेश दिला जातो तेव्हा ते नियमितपणे महाविद्यालयात येत नाहीत कारण ते सरावात व्यस्त असतात आणि सामन्यांमध्ये संस्थेचे प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच आम्ही त्याला वर्गात किंवा इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पाहिले नाही,” असं त्यांनी सांगितलं.
"अर्जुनने अलीकडेच पुरुषांच्या 92 किलो वजनी गटात भाग घेतला होता आणि दिल्ली ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं होते," अशी माहिती प्रशिक्षकाने दिली आहे.