मुंबई : आधार कार्ड अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आता जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. सरकारी कामांसाठी, सरकारी योजनांसाठी, बँक, घर-वाहन खरेदी यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे. आधारसंबंधी कोणतीही माहिती व्यक्तीच्या फोन नंबरवर, ओटीपीद्वारे पाठवली जाते. परंतु मोबाईल नंबर आधारमध्ये रजिस्टर असेल तरच ओटीपी फोनवर येतो. अशात फोन नंबर बदलल्यास किंवा फोन हरवल्यास पुन्हा सोप्या पद्धतीने मोबाईल नंबर आधारशी लिंक करता येऊ शकतो.
मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यासाठी, आधार केंद्रावर जाऊन फोन नंबर लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मला करेक्शन फॉर्म म्हटलं जातं. हा फॉर्म भरण्यासाठी 25 रुपये खर्च येतो. योग्य ती माहिती भरल्यानंतर आधार केंद्राकडून एक पावती दिली जाते. यात तुमचा रिक्वेस्ट नंबर असतो. या रिक्वेस्ट नंबरनुसार, मोबाईल क्रमांक आधारशी लिंक झाला की नाही ते पाहता येऊ शकते.
आधारशी नंबर लिंक होण्याची प्रक्रिया जवळपास तीन महिन्यांची असते. फोन नंबर आधारशी लिंक झाल्यानंतर एक ओटीपी येईल. या ओटीपीद्वारे आधार कार्ड डाऊनलोड करता येऊ शकतं. त्याशिवाय UIDAIच्या टोल फ्री 1947 नंबरवर फोन करुन तुमच्या रिक्वेस्ट, स्टेटसची माहिती घेता येऊ शकते.