अमरावती : इलेक्ट्रॉनिक वेंडींग मशिन शंभर टक्के हॅक होऊ शकते असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे. हॅकर्सच्या हाती लोकशाहीचा बळी दिला जाऊ शकत नाही असेही ते म्हणाले. व्हीव्हीपॅड पावत्याच शंभर टक्के काढायच्या की जुन्या मतपत्रिकांची व्यवस्था पुन्हा आणायच्या हे भारताच्या निवडणूक आयोगाने निश्चित करायला हवे असेही ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा दुरूपयोग केला जाऊ शकतो याबद्दल त्यांनी तेलगु देशम पार्टीच्या खासदारांच्या बैठकीत सांगितले.
विकसीत देश देखील ईव्हीएमचा वापर करत नाहीत. त्यामुळे ईव्हीएम वापरण्याचा दबाव निवडणूक आयोगाने टाकायला नकोय असेही ते म्हणाले. 2019-20 या वर्षात पूर्ण अर्थसंकल्प आणण्यासही टीडीपीने विरोध दर्शवला. लोकसभा निवडणूकीत भाजपाची हार निश्चित असल्याने पंतप्रधानांची घरी जाण्याची वेळ आल्याचे त्यांनी 25 जानेवारीला झालेल्या बैठकीत म्हटले होते. 'भारत वाचवा, लोकतंत्र वाचवा' चा नारा देशभरात गुंजतोय. विपक्षांच्या रॅलीची देशभरात चर्चा आहे.
जनतेच्या विरोधी शासन देश खपवून घेणार नाही. भाजपाचा विरोध हा राजकारणासाठी आणि मोदींचा विरोध हा लोकशाहीसाठी अनिवार्य असल्याचेही ते म्हणाले. पाच विधानसभा निवडणूकीतील भाजपाच्या पराजयाची त्यांनी यावेळी आठवण करुन दिली. आता सर्वेक्षण मोदींविरोधात स्पष्ट दिसतेय. भाजपा आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या पक्षांची हार या निवडणूकीत निश्चित असल्याचेही ते म्हणाले.