देवभूमीत जाण्याचा मार्ग मोकळा, काय मग कधी आखताय बेत?

या व्हिडिओच्या माध्यमातून पर्यटकांना एक प्रकारे केरळवासियांनी आपल्या राज्यात येण्याचं भावनिक आव्हानच केलं आहे

Updated: Sep 27, 2018, 06:33 PM IST
देवभूमीत जाण्याचा मार्ग मोकळा, काय मग कधी आखताय बेत? title=

मुंबई: वरुणराजाची आठवण झाली ती अनेकजण आभाळाकडे नजरा लावून असतात. मोठ्या अपेक्षेच्या नजरेने आभाळाकडे पाहतेवेळी वरुणराजा आपलं ऐकणार अशीच त्यामागे भावनाही असते. यंदाच्या वर्षी मात्र या वरुणराजाची अवकृपा काही राज्यांवर झाली आणि पाहता पाहता जीवित आणि वित्त हानीचा आकडा वाढतच गेला. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधील एक नाव म्हणजे केरळ.

देवभूमी केरळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यात पावसाने असा काही हाहाकार केला, ज्यामुळे या ठिकाणाचं चित्रट पालटून गेलं.

दैनंदिन जीवन, रोजच्या पायवाटा, शेती सारं सारंकाही जलमय झालं आणि देवभूमीकडे अनेकांनीच पाठ फिरवली.

केरळमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी झाला ज्याचे थेट परिणाम या राज्याच्या अर्थ व्यवस्थेवरही झाले. पण, तरीही आत्मविश्वासाच्या आणि इतरांनी केलेल्या मदतीच्या बळावर केरळातील जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.

पाहता पाहता या राज्याची कवाडं पुन्हा एकदा पर्यटकांच्या स्वगतासाठी खुली झाली. केरळ पर्यटन विकास मंडळातर्फे प्रदर्शित करण्यात आलेला व्हिडिओ पाहून याचा अंदाज सहज लावता येत आहे.

कार चालकांपासून ते कथकली हा नृत्यप्रकार सादर करणाऱ्यांपर्यंत, केरळातील खरी चव पर्यटकांच्या ताटात वाढणाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचं या व्हिडिओतून सांगण्यात आलं आहे.

#KeralaIsOpen अशा हॅशटॅगसह पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओतून पर्यटकांना एक प्रकारे केरळवासियांनी आपल्या राज्यात येण्याचं भावनिक आव्हानच केलं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.