Air India fined 30 lakh: एअर इंडियाच्या एका पायलेटने केलेल्या कृत्याचा फटका कंपनीला बसला आहे. या पायलेटवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याने केलेल्या कृतीमुळे कंपनीला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या पायलेटने आपल्या एका मित्राला विमानाच्या कॉकपिटमध्ये प्रवेश दिला. या प्रकरणाची दखल उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत विमान उड्डाणासंदर्भातील नियमन करणाऱ्या डायरेक्टरेट ऑफ सिव्हील एव्हीएशनने म्हणजेच डीजीसीआयने दखल घेतली आहे. डीजीसीआयने एअर इंडियाला 30 लाखांचा दंड ठोठावल्यानंतर कंपनीने या पायलेटला 3 महिन्यांसाठी निलंबित केलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकार 27 फेब्रुवारी रोजी घडला. एअर इंडियाच्या दिल्लीवरुन दुबईला जाणाऱ्या एआय-915 विमानामध्ये हा प्रकार घडला. विमानाच्या पायलेटने त्याच्या एका मैत्रिणीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिला. या पायलेटने मैत्रिणीला स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पायलेट दोषी आढळला आहे. एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याच विमानातील एका क्रू मेंबरने घडलेल्या प्रकरणाची माहिती देत तक्रार केली.
एअर इंडियाने या प्रकरणानंतर स्पष्टीकरण देताना, कंपनी आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही. या प्रकरणात दोषी आढळून येणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असं म्हटलं होतं. मात्र यानंतर कंपनीने कोणतीही कारवाई केली नव्हती. डीजीसीएच्या नियमांनुसार वैमानिक आणि क्रू मेंबर वगळता कोणालाही विमानाच्या कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नसते. त्यामुळेच डीजीसीएने एअर इंडियाला 30 लाखांचा दंड ठोठावला. यानंतर कंपनीला कारवाई करण्याचं भान आलं आणि त्यांनी संबंधित दोषी पायलेटचं 3 महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. पायलेटचं कृत्य हे नियमांचं उल्लंघन करणारं असल्याचं कंपनीने निलंबंनाची कारवाई करताना म्हटलं आहे.
विमानामधील कर्मचारी आणि पायलेटसाठीही डीजीसीएचे काही नियम आहेत. कंपनीच्या नियमांबरोबरच डीजीसीएचे नियमही सर्वांना बंधनकारक असतात. या नियमांचं विमानाच्या उड्डाणादरम्यान किंवा प्रवासी विमानात असताना उल्लेघन केल्यास कंपनीबरोबरच डीजीसीए सुद्धा कारवाई करु शकतं. प्रवाशांना असाप्रकारच्या समस्या जाणवल्या आणि त्यासंदर्भातील तक्रार मिळाल्यास डीजीसीए स्वत: अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कारवाई करते. काही महिन्यांपूर्वीच दारुच्या नशेत एका प्रवाशाने महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. त्यावेळेही डीजीसीएने कठोर कारवाई केली होती. या प्रकरणामध्ये न्यूयॉर्कहून दिल्लीला आलेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये एका व्यक्तीने दारुच्या नशेल महिला प्रवाशावर लंघुशंका केल्याने डीजीसीएने कंपनीला 30 लाखांचा दंड ठोठावला होता.