विमान कंपन्यांनी प्रवाशांचे पैसे परत द्यावेत; केंद्र सरकारचा आदेश

अनेक प्रवाशांचे पैसे अजूनही विमान कंपन्यांकडे अडकून पडले होते.

Updated: Apr 16, 2020, 05:06 PM IST
विमान कंपन्यांनी प्रवाशांचे पैसे परत द्यावेत; केंद्र सरकारचा आदेश title=

नवी दिल्ली: लॉकडाऊनच्या काळात रद्द झालेल्या विमान प्रवासाचे पैसे प्रवाशांना परत करण्यात यावेत, असे आदेश गुरुवारी नागरी हवाई मंत्रालयातर्फे देण्यात आले. या आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात (२५ मार्च ते १४ एप्रिल) प्रवाशांनी विमानाची तिकीटे बूक केली असतील तर त्यांना पूर्ण पैसे परत द्यावेत. प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यापासून तीन आठवड्यांच्या कालावधीत हे पैसे प्रवाशांना परत दिले पाहिजेत, असे हवाई मंत्रालयाने आपल्या निर्देशात म्हटले आहे. 

लॉकडाऊन-२ : 'राज्यात उद्योग-व्यापार २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मार्च रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानुसार देशांतर्गत विमान प्रवासावरही निर्बंध आणण्यात आले होते. तत्पूर्वी २२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांचा विमानप्रवास रद्द झाला होता. मात्र, त्यांचे पैसे अजूनही विमान कंपन्यांकडे अडकून पडले होते.

Corona : लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही- राहुल गांधी

दरम्यान, देशातील लॉकडाऊनचा कालावधी आता ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात विमान आणि रेल्वे प्रवासावरील निर्बंध शिथील होणार असल्याची वदंता होती. मात्र, केंद्र सरकारने हे निर्बंध कायम ठेवल्यामुळे या दोन्ही सेवा ठप्प आहेत. सध्या केवळ जीवनावश्यक आणि वैद्यकीय सामुग्रीची ने-आण करण्यासाठी विमानसेवा सुरु आहे. याशिवाय, लॉकडाऊननंतर काही दिवस भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात सोडण्यासाठी एअर इंडियाची विमाने उड्डाण करत होती. या गोष्टी वगळता सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्णपणे ठप्प आहे.