नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी LAC वरील स्थितीचा आढावा घेतला. डोवाल यांचं चीनशी कमांडर-स्तरावरील चर्चेकडेही लक्ष आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल अजित डोवल यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. गृहसचिव आणि गुप्तचर यंत्रणांचे प्रमुखही या बैठकीस उपस्थित होते. गुप्तचर यंत्रणांनी डोवल यांना चीनशी झालेल्या तणावाविषयी माहिती दिली.
चुशूल येथे सकाळी 10 वाजेपासून कमांडर स्तरीय बैठक सुरू आहे. पँगोंगमध्ये चीनपेक्षा भारतीय सेना चांगल्या स्थितीत आहे. चीनने भारतावर एलएसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. २८-२९ ऑगस्टच्या रात्री पँगोंग भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये पुन्हा झटापट झाली होती.
चिनी सैन्याने लडाखमधील पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील काही भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या अवैध कामासाठी सुमारे 500 चिनी सैनिक आले होते. चिनी सैनिकांकडे दोरी आणि इतर चढण्याची साधने होती. रात्रीच्या अंधारात चिनी सैनिकांनी ब्लॅक टॉप ते थाकुंग हाइट्स दरम्यान टेबल टॉप क्षेत्रात चढायला सुरवात केली पण भारतीय सेना आधीच सज्ज झाली होती. भारतीय सैनिकांनी प्रथम चिनी सैन्याला रोखले आणि त्यानंतर चीनला माघार घ्यायला भाग पाडले.
चीन फसवणूकीसाठी प्रख्यात आहे. एलएसी वादावरुन गालवानच्या घटनेनंतर चीन ज्या चर्चेबद्दल बोलत आहे, ती चीनची केवळ एक युक्ती असल्याचे दिसते. संवादाच्या वेषात वेळ घालवत चीनला भारताच्या पाठीत १९६२ प्रमाणे खंजीर खुपसायचा आहे. पण यावेळी भारतीय सैन्याने सर्व चिनी कट उधळले आहेत. गलवानप्रमाणेच चीन पँगोंगमध्ये भारतावर आरोप करत आहे. चायना आर्मीच्या वेस्टर्न आर्मी कमांडने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, 'सोमवारी भारतीय सैन्याने पुन्हा एलएसी ओलांडून चिथावणी दिली. भारताने तातडीने सैन्य मागे घ्यावे.'