नवी दिल्ली : बुधवारी जम्मू- काश्मीर येथील १८७ व्या बटालियनच्या तळात एका सीआरपीएफ जवानाने त्याच्याच साथीदारांवर गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात तीन सीआरपीएफ जवानांना त्यांचे प्राण गमवावे लागले. सीआरपीएफ अधिकाऱ्यांकडूनच याविषयीची माहिती देण्यात आली. उधमपूरच्या बट्टल येथील सीआरपीएफच्या तळावर ही घटना रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
कॉन्स्टेबल अजित कुमारने त्यांच्या सर्व्हिस रायफलने तीन साथीदारांवर गोळीबार केला. ज्यामध्ये त्या तिघांचाही मृत्यू झाला. मुख्य म्हणजे कुमार यांनी स्वत:वरही गोळी झाडून घेतली ज्यानंतर त्यांना सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे.
जवानांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे हा प्रसंग गोळीबारापर्यंत पोहोचला गेल्याचं म्हटलं जात आहे. बाचाबाचीच्या कारणावरुन झालेल्या या गोळीबारात राजस्थानच्या झुनझुनू येथील कॉन्स्टेबल पोकरमल आर, दिल्लीच्या योगेंद्र शर्मा आणि रेवारी हरियाणाच्या उमेद सिंह यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती सीआरपीएफ अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
गोळीबार नेमका बाचाबाचीमुळे झाला की आणखी कोणत्या कारणामुळे, यामागचं स्पष्ट कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पण, इतर निमलष्करी सुरक्षा दलांपेक्षा सीआरपीएफ जवानांवर असणारा कामाचा वाढता ताण हेसुद्धा त्यामागचं एक कारण असू शकतं, असं म्हटलं जात आहे. २०१५ मध्ये केंद्रात सादर करण्यात आलेल्या एका अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणे कामाच्या वाढत्या ताणामुळे सीआरपीएफ जवान हे समाजापासून दुरावले जात आहेत. जवानांवर वाढता तणाव पाहता ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे.