नवी दिल्ली: लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या आरोपांची दखल घेत त्याची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हेही पाहावे लागेल, असे शहा यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून एम.जे. अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नव्हती. अखेर अमित शहा यांनी याप्रकरणात मौन सोडत एम.जे. अकबर चौकशी होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पत्रकारिता करत असताना एम.जे. अकबर यांनी आपल्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप काही महिला पत्रकारांनी केला होता. या आरोपांनंतर विरोधकांनी अकबर यांच्या राजीनाम्यासाठी सातत्याने दबावही आणला. या काळात अकबर परदेश दौऱ्यावर होते. मात्र, पक्षाच्या आदेशानंतर ते हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले होते.