...म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला- अमित शहा

अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपलाही नाईलाजाने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घ्यावी लागली होती. 

Updated: Nov 27, 2019, 04:56 PM IST
...म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला- अमित शहा title=

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या लढाईतून भाजपने नाट्यमयरित्या घेतलेल्या माघारीनंतर बुधवारी अमित शहा यांनी आपले मौन सोडले. यावेळी त्यांनी अजित पवार आणि भाजपमध्ये झालेल्या वाटाघाटीसंदर्भात भाष्य केले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्याने भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, असा खुलासा अमित शहा यांनी केला.

मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीचे आमदार आपल्यासोबत येणार नाहीत, याची जाणीव झाल्यानंतर अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपलाही नाईलाजाने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घ्यावी लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अवघ्या चार दिवसांत राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे भाजपची चांगलीच नाचक्की झाली होती. 

शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, अमित शाह यांचा टोला

या सगळ्या प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांविषयी फार बोलणे टाळले होते. अजित पवार यांनी व्यक्तिगत कारणामुळे उपमुख्यमंत्रीपदावर राहू शकत नसल्याचे सांगत माझ्याकडे राजीनामा सोपवला, एवढीच माहिती फडणवीस यांनी दिली होती. 

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; शपथविधीसाठी 'त्या' शेतकऱ्याला आमंत्रण

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेसाठी बोलणी सुरु असताना २२ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यासाठी एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवण्यात होती. यावेळी राजभवनातून गुप्तपणे हालचाली झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पेच निर्माण झाला होता. मात्र, अजित पवार यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपचे सरकार अवघ्या ८० तासांत कोसळले होते.