Apple Store : जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे (World recession) संकेत असतानाच अॅपल (Apple ) मात्र वेगळ्याच आराखड्यानं पुढे जाताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या टेक कंपनीनं भारतात, मुंबईत त्यांचं पहिलंवहिलं स्टोअर सुरु केलं. त्यामागोमाग (Delhi) दिल्लीतही अॅपल स्टोअरची सुरुवात झाली. खुद्द अॅपलचे CEO टिम कुक (Tim Cook) यांनी या क्षणी स्टोअरच्या उदघाटन सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. अॅपल स्टोअरच्या या नव्या सुरुवातीचे साक्षीदार होण्यासाठी यावेळी मुंबईसह दिल्लीतही अनेकांनीच हजेरी लावली. तरुणाईची इथं लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली होती.
या क्षणांचे अनेक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले. या फोटोंमध्ये या स्टोअरपाशी असणाऱ्या गर्दीत हिरव्या रंगाच्या टीशर्टमध्ये बरीच मंडळी दिसली. पाहताक्षणी लक्षात आलं की ही मंडळी अॅपलसाठीच काम करतात. तिथं असणारी ही मंडळी तुम्हाला प्रोडक्ट दाखवतात, काही अडल्यास मदत करता, न थकता आणि न वैतागता तुमच्या प्रश्नांची हसतमुखानं उत्तरंही देतात. अशा या अॅपल कर्मचाऱ्यांचा पगार किती असेल बुवा? तुम्हालाही पडला का प्रश्न?
तुम्हाला जाणून धक्काच बसेल. कारण, टेक क्षेत्रातील जाणकारांच्या मते अॅपलच्या मुंबई आणि दिल्ली स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्याला 1 लाख रुपयांहूनही अधिक पगार कंपनी मोजतेय. इतर इलेक्ट्रॉनिक दुकानं इतकंच काय तर इतर खासगी संस्थांपेक्षाही सध्याच्या घडीला अॅपल या कर्मचाऱ्यांना जास्त पगार मोजत आहे.
बीटेक, एमटेक, एमबीए, इंजिनियर या क्षेत्रांमध्ये काम केलेल्या तरुणाईला इथं नोकरीवर ठेवण्यात आलं आहे. IT, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स, कंम्प्यूटर सायन्स, ऑटोमेशन इंजिनियरिंग अशा अनेक क्षेत्रांतील अभ्यासक्रमातून पुढं आलेल्या तरुणाईला अॅपल स्टोअरमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
एखाद्या कंपनीत जेव्हा कर्मचारी नोकरीवर रुजू होतो किंवा होते, त्यावेळी त्यांच्या संस्थेकडूनही काही अपेक्षा असतात. संस्थेकडून पुरवण्यात येणाऱया सुविधांच्या धर्तीवर या अपेक्षा आधारलेल्या असतात.
एका Career विषय संकेतस्थळाच्या वृत्तानुसार अॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या रिटेल वर्कर्सना संस्थेकडून आरोग्य आणि विमा सुविधांसोबतच भरपगारी सुट्ट्या, शिक्षणासाठीचा खर्च, स्टॉक ग्रँट या सुविधा देण्यात येणार आहेत. याशिवाय अॅपल प्रोडक्टच्या खरेदवरही त्यांना मोठी सवलत असेल. त्यामुळं कर्मचाऱ्यांना आनंदात ठेवत त्यांच्याकडून उत्तमोत्तम काम करून घेण्याचा अॅपलचा हा अंदाज सर्वांनाच भावला आहे.