जम्मू- काश्मीर : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; एक जवान शहीद

तीनजण जखमी...

Updated: Feb 9, 2020, 11:59 AM IST
जम्मू- काश्मीर : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; एक जवान शहीद  title=
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या खुरापती सुरुच असून, पुन्हा एकदा शेजारी राष्ट्राच्या सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर येथील पुँछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात भारतीय सैन्यातील एक जवान शहीद झाला आहे. तर, तीनजण जखमी असल्याचं कळत आहे. 

सुरक्षा दलांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेपाशी पाकिस्तानकडून मोर्टारचा मारा करण्यात आला. ज्यामध्ये नियंत्रण रेषेजवळील गावं आणि सैन्याच्या काही पोस्टवर निशाणा साधण्यात आला. शनिवारी सायंकाळी अचानकच पाकिस्तानकडून गोळीबार करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी पुँछमधील देगवार सेक्टरवर मोर्टरचा मारा सुरु केला. 

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याचं भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या या कारवाया वाढल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. शिवाय बालाकोट येथे असणारा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ पुन्हा सक्रिय झाल्याचंही सांगण्यात येत आहे. या ठिकाणी भारतात घुसघोरी करण्यासाठी जवळपास २७ दहशतवदाच्यांना प्रशिक्षणही दिलं गेलं आहे. 

मसूद अजहरचा मुलगा, युसूफ अजहर हा सध्या या दहशतवादी तळाचा म्होरक्या असल्याचं कळत आहे. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे भारतीय लष्कराकडूनही सुरक्षेच्या सर्व निकषांवर आणि नियंत्रण रेषेजवळील प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.