केजरीवाल यांनी मागितली कपील सिब्बल, गडकरींची माफी

गेले अनेक मिहिने केजरीवाल हे मानहानीच्या अनेक खडल्यांमध्ये न्यायालयाच्या चकरा मारत आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 19, 2018, 04:39 PM IST
केजरीवाल यांनी मागितली कपील सिब्बल, गडकरींची माफी title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या माफीनामासत्राची जोरदार चर्चा सुरु आहे. पंजाबमधील अकाली दलाचे नेते विक्रमी माजीठिया यांची माफी मागितल्यावर अरविंद केजरीवाल यांनी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते कपील सिब्बल यांचीही माफी मागितली आहे. गेले अनेक मिहिने केजरीवाल हे मानहानीच्या अनेक खडल्यांमध्ये न्यायालयाच्या चकरा मारत आहेत.

केजरीवाल यांनी सिब्बल, गडकरींना केली विनंती

केजरीवाल यांनी काँग्रेस नेते आणि कपील सिब्बल आणि त्यांचे पुत्र अमित सिब्बल यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत खेद व्यक्त केला आहे. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही एक पत्र लिहून आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत माफी मागितली आहे. तसेच, न्यायालयात आपल्यावर दाखल केलेला खटला मागे घ्यावा अशी विनंतीही केली आहे.

माफीनाम्याबद्धल 'आप'मध्ये नाराजी

दरम्यान, सूत्रांकडून प्राप्त झालेली माहिती अशी की, दोन्ही नेत्यांनी केजरीवालांशी झालेल्या चर्चेनंतर न्यायालयाकडे खटला मागे घेण्याबाबत अर्ज केला आहे. मात्र, माजिठिया यांची माफी मागितल्यामुले केजरीवाल यांना 'आप'ल्याच पक्षातील आमदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. पंजाब आपमधील आमदारांनी केजरीवाल यांच्या माफीनाम्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

केजरीवाल यांनी केले होते गंभीर आरोप

अरविंद केजरीवाल यांनी भारतातील सर्वाधिक भ्रष्ट लोकांच्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव सहभागी असल्याचे म्हटले होते. या आरोपावर प्रचंड नाराज झालेल्या गडकरी यांनी केजरीवाल यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला होता. हा खटला अद्यापही न्यायालयात सुरू आहे. केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, माझा आपल्याशी काहीही वाद नाही. मागे मी केलेल्या टीपण्णी मागे घेतो.

दरम्यान, केजरीवाल यांनी कपील सिब्बल यांच्यावरही एक पत्रकार परिषद (२०१३) घेऊन व्यक्तीगत लाभासाठी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप केला होता.