'विमानासोबत एअर होस्टेसलाही विकत घेईल'; वैमानिकाला धमकावणाऱ्या बड्या नेत्याला फ्लाईटमधून उतरवलं खाली

वैमानिकासह  एअर होस्टससह गैरवर्तणूक केल्याप्रकरणी आसामच्या एका बड्या नेत्याला विमानातून खाली उतरवण्यात आलं आहे. त्याच्यासोबत 10 प्रवाशांनाही खाली उतरवलं गेलं होतं. दुसरीकडे आपण स्वतःच विमानातून खाली उतरलो असे या प्रवाशाने म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 7, 2023, 07:29 AM IST
'विमानासोबत एअर होस्टेसलाही विकत घेईल'; वैमानिकाला धमकावणाऱ्या बड्या नेत्याला फ्लाईटमधून उतरवलं खाली title=
(फोटो सौजन्य - Reuters)

Ruckus in flight : गेल्या काही दिवसांपासून विमानानांमध्ये (flight) गैरप्रकार घडण्याच्या घटना सातत्याने घटत आहेत. अशातच आसामच्या (Assam) एका बड्या नेत्याने विमानातील कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक केल्यामुळे त्याला खाली उतरवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आसामच्या या बड्या नेत्याला प्रोटोकॉल तोडल्याबद्दल आणि एअर होस्टेसशी गैरवर्तन केल्याबद्दल आसामच्या कचार जिल्ह्यात विमानामधून खाली उतरवण्यात आले. या सगळ्या प्रकारानंतर आसाममधील सिलचर येथील कुंभीरग्राम विमानतळावर मोठा गोंधळ उडाला होता. विमानतळ अधिकाऱ्यांनी मंगळवारी या घटनेची माहिती पोलिसांना (Assam Police) दिली मात्र पुढील कारवाई झाली नाही.

प्रवाशाने विमानात प्रवास करण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास नकार दिल्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रवाशाने एअर होस्टेसने समजून सांगितल्यानंतरही नियम न पाळता त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. त्यानंतर प्रवाशाला विमानातून उतरवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या इतर 10 सहप्रवाशांनाही विमानातून खाली उतरवण्यात आले. मंगळवारी दुपारी हा सगळा प्रकार घडला होता भाजप नेते सुजित दास चौधरी त्यांच्या मित्रांसह सिलचरमधील कुंबीरग्राम विमानतळावर कोलकात्याला जाणार्‍या विमानात चढले होते.

कुंबीरग्राम विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सुजीत चौधरी हे टेकऑफच्या वेळी प्रोटोकॉल मोडून मोबाईल फोनवर बोलत होते. क्रू मेंबर्सनी त्यांना मोबाईल वापरु नका असे सांगितले. त्यावर सुजीत चौधरी यांना राग अनावर झाला आणि त्यांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एअर होस्टेसला धमकावणे सुरू केले आणि सांगितले की माझ्याकडे तुझ्यासह फ्लाइट खरेदी करण्याची क्षमता आहे."

हा सगळा प्रकार विमानाच्या कॅप्टनपर्यंत पोहोचला. त्यांनी गैरवर्तणूक करणाऱ्या सुजित चौधरीला तात्काळ विमानातून उतरवण्याचा आदेश दिला. सुजित दास चौधरी यांच्यासोबत 10 प्रवाशांनाही खाली उतरवण्यात आलं. दुसरीकडे आपल्याला विमानातून उतरवलं नाही तर खराब विमानामुळे आपण विमानात बसलो नाही, अशी माहिती बराक व्हॅली कैबर्टा अपग्रेडेशन कौन्सिलचे अध्यक्ष सुजित दास चौधरी यांनी दिली.

"मी यापूर्वी अनेक फ्लाइट्समध्ये प्रवास केला आहे, पण जेव्हा मी त्या फ्लाइटमध्ये प्रवेश केला तेव्हा मला दिसले की सीट तुटलेल्या आहेत, एअर कंडिशनर्स काम करत नाहीत आणि स्वच्छतेचा नाहीये. मी क्रू मेंबर्सना एअर कंडिशनर दुरुस्त करण्यासाठी आणि फ्लाइट साफ करण्यासाठी विनंती केली पण त्यांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि मी फ्लाइटमधून उतरण्याचा निर्णय घेतला. ते माझ्याशी वाद घालू लागले. मी ठरवले की अशा वाईट परिस्थितीत प्रवास करायचा नाही, म्हणून मी खाली आलो," असे सुजित दास चौधरी म्हणाले.