बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेल्या महिन्यात विवाहबंधनात अडकले आहेत. 2017 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. नुकतंच सोनाक्षीने 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत लग्नानंतर आपलं आयुष्य कसं सुरु आहे याबद्दल सांगितलं. सोनाक्षी म्हणाली की, "यापेक्षा उत्तम काय असू शकतं. सर्वात सुंदर बाब म्हणजे मला फारसा बदल झालेला वाटत नाही, बरंचसं आधीसारखं आहे. लग्नाआधी माझं आयुष्य पूर्णपणे सेट होतं याचा मला आनंद आहे आणि आता मी पुन्हा त्याकडे परतले आहे. पुन्हा कामावर जात असल्याने मी आनंदी आहे".
सोनाक्षी सिन्हाने यावेळी ती गरोदर असल्याच्या चर्चांवरही उत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल रुग्णालयातून बाहेर येताना दिसल होते. लग्नानंतर लगेचच दोघे रुग्णालयात दिसल्याने सोनाक्षी सिन्हा गरोदर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र सोनाक्षी सिन्हा यावेळी रुग्णालयात दाखल आपले वडील शत्रुघ्न सिन्हा यांना भेटण्यासाठी गेली होती. शत्रुघ्न सिन्हा नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते.
गरोदर असल्याच्या अफवांवर सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, "फक्त एकमेव बदल झाला आहे तो म्हणजे आता आम्ही रुग्णालयात जाऊ शकत नाही. कारण तुम्ही रुग्णालयात बाहेर येताच लोकांना तुम्ही गरोदर आहात असं वाटता".
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या Double XL चित्रपटात एकत्र काम केलं होतं. लग्नानंतर दोघांनी इंस्टाग्रामववर विवाहसोहळ्याचे फोटो शेअर केले होते. "आजच्याच दिवशी, सात वर्षांपूर्वी (23.06.2017) एकमेकांच्या डोळ्यात, आम्ही प्रेम पाहिलं आणि ते टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमाने आम्हाला सर्व आव्हानांचा सामना करण्याची ताकद दिली आणि विजयांमध्ये मार्गदर्शन केलं... या क्षणापर्यंत... जिथे आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवतांच्या आशीर्वादाने... आता आम्ही पती- पत्नी आहोत, यापुढेही हे प्रेम, आशा असंच कायम राहू दे," अशी कॅप्शन फोटोला देण्यात आली होती.
सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरामंडी' वेब सीरिजमध्ये काम केलं. आता ती रितेश देशमुख आणि साकिब सलीमसोबत हॉरर कॉमेडी काकुडामध्ये दिसणार आहे. काकुडा 12 जुलै रोजी ZEE5 वर प्रीमियर होईल.