'पनौती कोण?'; काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने लगावला टोला

Assembly Elections Result 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर तेलंगणा काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसला पराभव समोर दिसत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूने काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 3, 2023, 02:21 PM IST
'पनौती कोण?'; काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने लगावला टोला title=

Assembly Elections Result 2023 : देशातील चार महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. मध्य प्रदेशात (MP) भाजपने (BJP) एकहाती सत्ता मिळवली आहे. तर केवळ तेलंगणामध्ये काँग्रेसमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस पराभवावरुन विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाने (Danish Kaneria) देखील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन भाष्य केलं आहे. 

वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर ट्रेंड झालेल्या पनौती शब्दवरुन दानिश कनेरियाने काँग्रेसने निशाणा साधल्याचे म्हटलं जात आहे. कोणाचेही नाव न घेता दानिश कनेरियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पनौती कोण आहे? असा सवाल विचारला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यानच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी यासाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरले होते. 

यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भरसभेत पनौती असा उल्लेख केला होता. 'ठीक आहे, भारतीय संघाची मुले खेळत होती. पनौती आली आणि त्यांचा पराभव झाला, असे राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. यानंतर काँग्रेस पक्षातील सर्व बड्या नेत्यांनीही पंतप्रधान मोदींसाठी पनौती हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता निकालानंतरत भाजप समर्थकांनी सोशल मीडियावर काँग्रेसच्या पराभवावरुन टीका केली आहे. आता सांगा पनौती कोण? असा सवाल भाजप समर्थक विचारत आहेत.

दरम्यान, सत्ताधारी छत्तीगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस पराभवाच्या दिशेने झुकलं आहे. सुरुवातीच्या कलानुसार मध्य प्रदेशात भाजपच्या खात्यात 160 तर काँग्रेसच्या खात्यात 67 जागा मिळाल्या आहेत. तर राजस्थानमध्ये भाजप 109 जागांवर आघाडीवर आहे. 74 जागा काँग्रेसला आणि 16 इतरांना मिळाल्या आहेत. तर छत्तीसगडमध्ये भाजपला 55 जागा, काँग्रेसला 33 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी मिळाली आहे. तेलंगणात काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे. तर बीआरएस सध्या 42 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर भाजपने 9 जागांवर आघाडी मिळवली आहे.