विमान इंधनाच्या दरात विक्रमी घट; पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त

कदाचित शहरी भागांमध्ये मिळणाऱ्या केरोसिनची किंमतही विमानाच्या इंधनापेक्षा अधिक असेल. 

Updated: Jan 1, 2019, 04:19 PM IST
विमान इंधनाच्या दरात विक्रमी घट; पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त title=

नवी दिल्ली: भारतात विमानांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाच्या दरात १४.७ टक्के इतकी विक्रमी कपात झाली आहे. त्यामुळे आता विमानाचे इंधन पेट्रोल-डिझेलपेक्षाही कमी दरात मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर एव्हिएशन टर्ब्युन फ्युएलची (एटीएफ) प्रतिकिलोलीटर किंमत साधारण ६८ हजाराच्या आसपास होती. मात्र, यामध्ये तब्बल १४.७ टक्के म्हणजे ९९०० रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे आता एव्हिएशन टर्ब्युन फ्युएलची किंमत ५८,०६०.९७ रुपयांवर पोहोचल्याची माहिती सरकारी तेल कंपन्यांकडून निवेदनाद्वारे देण्यात आली. 

या महिन्यात एटीएफच्या दरात झालेली ही दुसरी मोठी घसरण आहे. यापूर्वी १ डिसेंबरला एटीएफच्या दरात १०.९ टक्के इतकी लक्षणीय घसरण झाली होती. यामुळे विमानाच्या इंधनाचे दर कधी नव्हे इतक्या निचांकी पातळीला जाऊन पोहोचले आहेत. मात्र, यामुळे आर्थिक चणचण असलेल्या विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  दरातील ही घसरण इतकी लक्षणीय आहे की, आता भारतात विमानाचे इंधन पेट्रोल-डिझेलपेक्षा कमी दरात मिळेल. कदाचित शहरी भागांमध्ये मिळणाऱ्या केरोसिनची किंमतही विमानाच्या इंधनापेक्षा अधिक असेल. 

गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीची पावले उचलली होती. यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर काही प्रमाणात उतरले होते. आजदेखील महानगरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १७ पैसे पर्यंत घट झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात १९ पैसाने तर डिझेलच्या दरात २ रुपयांनी घट झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर ६८.६५ तर डिझेल प्रतिलीटर ६२.६६ रुपयाने मिळत आहे. मुंबईत पेट्रोलसाठी प्रतिलीटर ७४.३० रुपये तर डिझेलसाठी प्रतिलीटर ६५.५६  रुपये मोजावे लागत आहेत.