Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अतिशय भव्य असणार आहे. देशभरातील रामभक्त अयोध्या राम मंदिर सोहळा पाहणार आहेत. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी अनेक आस्थापनांना सुट्टीदेखील जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बॅंका, विमा कंपन्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त या आस्थापनांमध्ये 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद पाळला जाणार आहे. केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.
सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. या आस्थापना दुपारपर्यंत बंद असणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांनी देखील हा निर्णय घेतलाय.
केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढत निर्णयाची घोषणा केली आहे. यामुळे केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणारी कार्यालयं, संस्था दुपारी 2.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, कर्मचार्यांच्या उदंड भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने 22 जानेवारी 2024 रोजी सर्व केंद्र सरकारची कार्यालयं, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनं राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
All Public Sector Banks/Public Sector Insurance Companies/Public Sector Financial Institutions and Regional Rural Banks to observe half-day closing till 2:30 pm on 22nd January on the occasion of pranpratishtha of Ayodhya Ram Temple. pic.twitter.com/84ybXm3Ase
— ANI (@ANI) January 18, 2024
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुट्टीची घोषणा कऱण्यात आली आहे. दरम्यान शाळा, कॉलेजलाही सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अद्याप त्यासंबंधी निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मंत्र्यांना आपापल्या मतदारसंघात हजर राहण्यास सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मंत्र्यांना दिवाळीप्रमाणे हा दिवस साजरा करा असं आवाहन केलं आहे. तसंच हे करताना मर्यादा पाळा असंही सांगितलं आहे.
दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, हरियाणा या भाजपाशासित प्रदेशांनी सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही सुट्टी जाहीर करण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. पण याबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही.