नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यातील चैनपूर मतदारसंघातील आमदार राजेश मिश्रा यांच्यापासून आपल्या जीवाचा धोका असल्याचा आरोप त्यांच्याच मुलीनं केलाय. आपल्या कुटुंबीयांपासून लपत-छपत राजेश मिश्र यांची मुलगी साक्षी हिनं ४ जुलै रोजी प्रयागराजच्या राम-जानकी मंदिरात दलित तरुणासोबत प्रेमविवाह केलाय. फरीदपूरच्या आमदाराच्या भाचा असलेल्या या तरुणाचं नाव अजितेश कुमार असं आहे. साक्षी आणि अजितेशनं नुकतंच वैदिक हिंदू परंपरेनुसार विवाह केलाय. यानंतर मात्र, आपल्या कुटुंबाकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं सांगत साक्षीनं अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सुरक्षेची मागणी केलीय. साक्षीची ही याचिका न्यायालयानं स्वीकार केलीय. आज उच्च न्यायालय या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. या याचिकेत साक्षीनं आपण सज्ञान असून मर्जीनं विवाह केल्याचं म्हटलं आहे.
याअगोदर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत साक्षीनं 'आपल्याला आपल्याच वडिलांकडून, भावाकडून आणि त्यांच्या जवळच्यांकडून आपल्या आंतरजातीय लग्नाला विरोध आहे. त्यामुळे आपल्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचं' म्हटलंय. एवढंच नाही तर बरेलीच्या पोलिसांवरही आमदार असलेले वडील दबाव टाकत असल्याचा आरोप तिनं केलाय.
BJP MLA from Bareilly, Rajesh Kumar Mishra alias Pappu Bhartaul's daughter has married a man of her choice. The BJP MLA is now after their life, has sent goons. His daughter has released this video requesting help! @Uppolice
Source: @saurabh3vedi
— Gaurav Pandhi गौरव पांधी (@GauravPandhi) July 10, 2019
साक्षीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साक्षीचे पिता राजेश मिश्रा यांनी एक प्रेस रिलीज जाहीर केलंय. यामध्ये 'आपली मुलगी सज्ञान असून तिला तिचे अधिकार घेण्याचा अधिकार आहे. कुणीही त्यांना ठार मारण्याची धमकी दिलेली नाही. माझ्याकडून कुणालाही धोका नाही' असं या पत्रकात म्हटलं गेलंय.
विवाहानंतर घाबरलेल्या साक्षी आणि अजितेशनं आपला पत्ताही कुणाला कळू दिलेला नाही. परंतु, त्यांचा मोबाईल लोकेशन काढत त्यांचा ठावठिकाणा काढण्याचा प्रयत्न करत साक्षीचे कुटुंबीय वाराणसीलाही पोहचले होते. परंतु, त्यापूर्वीच साक्षी आणि अजितेश तिथूनही गायब झाले होते.