भय्यूजी महाराजांच्या मृत्यूनंतर 'सर्वोद्य आश्रमा'वर अवकळा

भय्यूजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यांत सर्वोदय आश्रमातलं चित्रं पार बदललंय

Updated: Dec 4, 2018, 01:50 PM IST
भय्यूजी महाराजांच्या मृत्यूनंतर 'सर्वोद्य आश्रमा'वर अवकळा title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, इंदूर : जिवंत असताना भय्यू महाराज देशात मोठं प्रस्थ होतं. राजकारणाप्रमाणेच अनेक क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. इंदूरमधला त्यांचा सर्वोदय आश्रम घडामोडींचे केंद्रबिंदू मानला जायचा. पण, आता त्यांच्या पश्चात आश्रमाची नेमकी काय स्थिती आहे? मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या बापट चौकात असलेला हा भय्यूजी महाराजांचा 'सर्वोदय आश्रम'... कधीकाळी इथं व्हीव्हीआयपींची मोठी ऊठ-बस असायाची. महाराष्ट्र, मध्यप्रदेश तसंच केंद्रातली विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी, मुख्यमंत्री ते अगदी देशाचे पंतप्रधान... असं कुणी नव्हतं की ज्यांचे पाय या आश्रमाला लागले नसतील. पण भय्यूजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यांत इथलं चित्रं पार बदललं. 

सर्वोदय आश्रमात शुकशुकाट 

नुकताच मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा माहोल होता. पण या काळातही आश्रमात शुकशुकाट होता. महाराजांच्या पश्चात व्हीव्हीआयपींनी सर्वोदय आश्रमाकडे पाठ फिरवली. हा अनुभव सांगताना आश्रमाचे सर्वात ज्येष्ठ जुने सेवेकरी वसंत शेवाळे यांचा संताप त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसला. 

आश्रमाच्या बाहेर एका फळ्यावर दररोज भय्यूजींचा सुविचार लिहिला जातो. आम्ही ज्या दिवशी या आश्रमाला भेट दिली त्या दिवशी फळ्यावर सुविचार लिहिला होता... इस घोर कलयुग में भाई तो जिंदा है, भाईचारा मर गया... वाणी को वीणा का काम करना चाहिये, बाण का नहीं... 

आश्रमाच्या दर्शनी भागापासून ते सर्वत्र भय्यूजी महाराजांची प्रसन्न मुद्रा पाहायला मिळते. पण एका कोपऱ्यात पडलेला चपलांचा रिकामा स्टँड आश्रमाची आजची परिस्थिती स्पष्ट करतो. आश्रमाच्या बाहेर भय्यूजी महाराजांनी लोकांच्या सेवेसाठी सुरु केलेल्या रुग्णवाहिका आज वापराविना धूळ खात उभ्या आहेत. आता हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सेवेकरी शिल्लक राहिलेत. ते आपापल्या परीनं आश्रमाचा दैनंदिन कारभार ढकलतात. 

भय्यूजी महाराज (फाईल फोटो)
भय्यूजी महाराज (फाईल फोटो)

भय्यूजी भक्तांच्या आठवणीत कायम

आश्रमाच्या तळमजल्याला भय्यूजींच्या पादुकांचं नित्यनियमानं पूजन होतं. पहाटे होमहवन झाल्यानंतर श्री दत्तगुरु, काली मातेच्या मंदिरात पूजा-अर्चना होते. धुनीच्या जागेचं पावित्र्य राखलं जातं. देशभरातून भक्तगण येत असल्यानं आश्रमात सर्व सूचना हिंदी भाषेत आहेत. तळ मजल्यावर मंदिराजवळ गुरु गादी आहे. भय्यूजी इथंच त्यांच्या भक्तांना भेटत असत. त्यांची गाऱ्हाणी, समस्यां ऐकत असत. त्यावर उपाय सांगत. भय्यूजी असताना सोमवार आणि मंगळवार ते भक्तांना भेटायचे. देशाच्या कोनाकोपऱ्यातून भक्तांची मोठी गर्दी इथं होत असे. पण भय्यूजींनंतर आता भक्तीचा तो ओघ पूर्णपणे आटलाय.

सेवेकऱ्यांकडून प्रथा सुरूच 

गुरू गादीची निगा राखणारे अनिल परदेशी आपला अलीकडच्या काळातला अनुभव सांगतात. भय्यूजी असताना अनिल परदेशी यांनी अनेक व्हीव्हीआयपींना आपली कामं घेऊन भय्यूजींच्या दरबारात आलेलं पाहिलंय. भय्यूजींचे राजकीय लागेबांधे खूप वरपर्यंत होते. पण आता गुरुजी नसल्यानं ते वलय संपुष्टात आल्याचं परदेशी सांगतात. एक काळ असा होता की व्हीव्हीआयपींची आश्रमात वर्दळ होती. आश्रमासमोर आलिशान गाड्यांचा ताफा उभा असायचा. प्रसाद म्हणून जेवणाच्या पंगती उठायच्या. कुणीही आश्रमातून रिकाम्या पोटी परत जात नसे. प्रत्येकाला प्रसाद हा अनिवार्यच असे. भय्यूजींनंतर आजही ती प्रथा सेवेकऱ्यांनी सुरू ठेवली आहे. भय्यूजींनी नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच प्रसाद तयार केला जातो. पण आश्रमात येणाऱ्या लोकांचंचं प्रमाण कमी झाल्यानं इथं जेवणाच्या पंगती आता दिसत नाहीत. 

सोशल मीडियातील भय्यूजी

आश्रमाच्या दुसऱ्या मजल्यावर यज्ञकुंड आहे. दररोज सकाळी इथं होमहवन होतो. इथं गरीब महिलांना देण्यासाठी आणलेली काही शिवणयंत्रं दिसली. पण तीही आज धूळ खात पडून आहेत. भय्यूजी आज हयात नाहीत, पण समाज माध्यमातून ते त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचतात. त्यांच्या फेसबुक पेजवर दररोज सुविचार, आरती प्रदर्शित होतात. देशविदेशातल्या घडामोडींवरही भाष्य असतं. पण भय्यूजींच्या पश्चात भक्तांची या माध्यमांवरची संख्याही घटली आहे. 

भय्यूजी महाराज (फाईल फोटो)
भय्यूजी महाराज (फाईल फोटो)

भय्यूजींच्या मृत्यूबद्दल संशय कायम 

आश्रमाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या दालनात हरी भक्त पारायण राजेंद्र महाराज शास्त्री भेटले. पेशाने कीर्तनकार असलेल्या शास्त्रीनी भय्यूजींच्या आत्महत्येबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं. त्यांनी भय्यूजींच्या मृत्यूच्या घटनेबद्दल संशय व्यक्त करताना सीबीआय चौकशीची मागणी केली.

मावळता सूर्य?

आश्रमात दररोज सायंकाळी पारायण होतं. गुरुवारी महाआरती होते. संयोगाने आम्ही गुरुवारी आश्रमात गेलो होतो. त्यामुळे महाआरती पाहाण्याचा योग जुळून आला. आश्रमातून मी निघेपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. आणि भय्यूजी महाराजांनी उभ्या केलेल्या सूर्योदय आश्रमावर जणू मार्मिक भाष्य करत होता. उगवत्या सूर्याला नेहमीच दंडवत घातला जातो, पण मावळत्या सूर्याच्या नशिबी ते भाग्य नसतं. भय्यू महाराज्यांच्या सर्वोदय आश्रमाच्या बाबतीतही आज तेच घडताना दिसतंय.