नऊ महिन्यानंतर स्वस्त झालं पेट्रोल, डिझेलच्या किंमतीही घसरल्या

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुढचे काही दिवस निर्णायक ठरतील

Updated: Dec 4, 2018, 12:33 PM IST
नऊ महिन्यानंतर स्वस्त झालं पेट्रोल, डिझेलच्या किंमतीही घसरल्या title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरणीचा परिणाम घरगुती बाजारातील किंमतींवरही झालाय. मंगळवारी सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डीझेलच्या भावांत घसरण झालीय. मुंबईत १३ व्या दिवशी पेट्रोलचा दर ७७.२९ रुपये प्रती लीटर दाखल झालाय. तर दिल्लीत पेट्रोलचा दर ७१.७२ आणि डिझेलचा दर ६६.३९ रुपये प्रती लिटरवर पोहचलाय. आज कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ७३.७५ प्रती लिटर आहे. 

गेल्या काही महिन्यांचा उल्लेख करायचा तर मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत गेल्या नऊ महिन्यांत सर्वात खालच्या स्तराला पोहचल्यात. यापूर्वी, २ मार्च २०१८ रोजी मुंबईत पेट्रोलचा दर ७९.६३ रुपये प्रती लिटर होता तर दिल्लीत २ मार्च २०१८ रोजी पेट्रोल ७१.७५ रुपये प्रती लिटरच्या स्तरावर होतं. तब्बल नऊ महिन्यानंतर पेट्रोलचा दर या स्तरावर आलाय. 

त्याचप्रमाणे डिझेलच्या किंमतीही १६ मे २०१८ रोजी ६६.५७ रुपये प्रती लिटरवर होत्या. जवळपास साडे सहा महिन्यानंतर डिझेलचे दर ६६.३९ रुपये प्रती लिटरवर पोहचल्यात. 

रुपया मजबूत होतोय

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुढचे काही दिवस निर्णायक ठरतील. रुपया सध्या मजबूत होताना दिसतोय. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ७० च्या स्तरावर आहे.