नवी दिल्ली: हरिद्वार कुंभमेळा लवकरच संपण्याची शक्यता आहे. निरंजनी अखाडानं कुंभमेळा संपल्याचं जाहीर केलंय. दोनच दिवसात ते कुंभमेळ्यातून बाहेर पडणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता निरंजनी आखाड्याचे महंत रविंद्र पुरी यांनी हा निर्णय घेतला आहे. १७ एप्रिल रोजी निरंजनी आखाड्याचा हरिद्वार कुंभमेळा समारोप होईल.
इतर आखाड्यांनाही मेळावा संपविण्याची विनंती करण्यात आली आहे. काल निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचा कोरोना मुळे मृत्यू झालाय.
कुंभमेळ्याच्या ठिकाणी १७०० जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. यानंतर देशभरातून यावर टीका झाली. त्यामुळे निरंजनी आखाड्यानं कुंभमेळा संपल्याची घोषणा केलीय.
भारतात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होतेय. नव्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. गुरुवारी देशभरात गेल्या तासांत २ लाख नवीन केसेस नोंदवल्या गेल्या. तर बुधवारी (14 एप्रिल) रोजी 1.85 नवीन केसेस नोंदवल्या गेल्या.
24 तासात 199620 लोक संक्रमित
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात 1 लाख 99 हजार 620 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या काळात 1037 लोक मरण पावले. त्यानंतर, भारतात कोरोनाची लागण होणारी संख्या 1 कोटी 40 लाख 70 हजार 300 पर्यंत गेली आहे आणि 1 लाख 73 हजार 152 लोकांचा मृत्यू झालाय.
भारतात जवळपास 2 लाख केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. तर 10 दिवसांपूर्वी देशात दररोज 1 लाख लोकांची नोंद झाली होती. म्हणजेच अवघ्या दहा दिवसांत संक्रमणाचा रोजचा आकडा 1 लाख ते 2 लाखांपर्यंत पोहोचला आहे.