ओडिशाचे (Odisha) विरोधी पक्षनेते आणि भाजपा आमदार जयनारायण मिश्रा (BJP MLA Jaynarayan Mishra) यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला (Woman Police Officer) अपमानास्पद वागणूक दिली असल्याने वाद निर्माण झाला आहे. संबलपूर येथे भाजपाच्या आंदोलनादरम्यान जयनारायण मिश्रा यांनी धक्काबुक्की तसंच शिवीगाळ केल्याचा महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप आहे. याआधी जयनारायण मिश्रा यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप केला होता. दरम्यान आमदारांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. याउलट महिला पोलीस अधिकारी अनिता प्रधान (Anita Pradhan) यांनी आपल्याला धक्का दिल्याचा त्यांचा आरोप आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळत असल्याच्या निषेधार्थ भाजपाने संबलपूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन आयोजित केलं होतं. यादरम्यान आमदार जयनारायण मिश्रा आणि पोलीस अधिकारी अनिता प्रधान यांच्यात वाद झाला.
अनिता प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा कार्यकर्ते परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी जयनारायण मिश्रा त्यांच्यासमोर आले आणि तुम्ही कोण आहात अशी विचारणा केली.
"जेव्हा मी माझी ओळख सांगितली, तेव्हा त्यांनी मला दरोडेखोर म्हटलं आणि लाच घेतल्याचा आरोप केला. जेव्हा मी त्यांना माझ्यावर असे आरोप का करत आहात अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी मला चेहऱ्यावर हात लावत मागे ढकललं," असं अनिता प्रधान यांनी सांगितलं आहे.
Shocked & anguished after seeing this video! A senior leader of Odisha, Shri. Jayanarayan Mishra, physically assaulting & threatening an on-duty Police Officer! I have always stood for equality and this undoubtedly doesn’t define equality at all. Shame!!!@JPNadda pic.twitter.com/07uX6o6Jqt
— Anubhav Mohanty (@AnubhavMohanty_) February 15, 2023
जयनारायण मिश्रा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलीस महिला कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचं ऐकून मी पुढे गेलो होतो असा त्यांचा दावा आहे. "मी पोलिसांविरोधात बोलत असल्याचं सांगत मला ढकलण्यात आलं. मी कोणालाही धक्का दिला नाही. पोलिसांविरोधात आरोप असल्याने त्यांनी हा कट रचला आहे. मी त्या महिला पोलीस अधिकाऱ्याला ओळखतही नाही," असं ते म्हणाले आहेत.
संभलपूरचे पोलीस अधिक्षक बी गंगाधर यांनी याप्रकरणी सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून चौकशी केली जाईल असं म्हटलं आहे.
भाजपा प्रवक्ते ललितेंदू बिद्याधर मोहपात्रा यांनी यावर भाष्य करताना म्हटलं आहे की "झारसुरगुडा जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्याने एका नेत्याची हत्या केली. आता एक महिला अधिकारी विरोधी पक्षनेत्याला शिवीगाळ करत आहे. ओडिशात कोणतीही कायदा-सुव्यवस्था नाही. मुख्यमंत्री अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करतात हे आम्ही पाहत आहोत".
दरम्यान बीजेडीचे प्रवक्ते श्रीमयी मिश्रा यांनी जयकुमार मिश्रा यांच्याविरोधात 14 गुन्हे दाखल असून यामध्ये हत्येचाही गुन्हा असल्याचं सांगितलं आहे. हत्येच्या आरोपाखाली ते जेलमध्येही होते. लोकांना धमकावणं आणि छळ करण्यासाठी ते ओळखले जातात असंही त्यांनी सांगितलं.