सरकारी कार्यक्रमात मांसाहारी पदार्थ नको; लोकसभेत मांडले विधेयक

राजकीय पक्ष पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता

Updated: Dec 30, 2018, 01:17 PM IST
सरकारी कार्यक्रमात मांसाहारी पदार्थ नको; लोकसभेत मांडले विधेयक title=

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून देशभरात गोमांसावरून सुरु असलेल्या वादात आता आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. भाजपचे खासदार प्रवेश साहेब सिंह यांनी शुक्रवारी लोकसभेत सरकारी कार्यक्रमात मांसाहारी पदार्थांवर बंदी घालण्यासाठीचे खासगी विधेयक मांडले. यावरुन राजकीय पक्ष पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. लोकसभेत प्रत्येक शुक्रवारी अखेरचे दोन तास हे खासगी सदस्यांच्या कामकाजासाठी राखून ठेवले जातात. मंत्रीपदावर नसलेला संसदेतील प्रत्येक खासदार हा खासगी सदस्य मानला जातो. यावेळी खासदार स्वतंत्रपणे एखादे विधेयक संसदेत मांडू शकतात. मात्र, हे विधेयक सादर करण्याच्या महिनाभर आधी सभागृहात तशी नोटीस द्यावी लागते. मात्र, सरकारी विधेयकांच्या तुलनेत ही खासगी विधेयक पारित होण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. 

दरम्यान, यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीही खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्यादृष्टीने महत्वाचे विधेयक मांडले. कामाच्या कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त कार्यालयातून येणाऱ्या कामासंबंधीच्या कॉल आणि इमेलपासून दूर राहण्याचा अधिकार द्यावा. तसेच सुटीच्या दिवशी व कामाच्या वेळेशिवाय बॉस आणि कार्यालयातून येणारे कामासंबंधी कॉल आणि ईमेल रिजेक्ट करण्याचाही अधिकार देणारी कामगार कल्याण प्राधिकरण स्थापना करावे, असे या विधेयकाचे स्वरुप आहे. हे विधेयक पारित झाल्यास कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी वा कार्यालयीन वेळेनंतर कामासंबंधीचे कॉल आणि ईमेलला नकार देण्याचा हक्क मिळेल.