भाजप राहुल गांधींविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार

राहुल गांधी आपल्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ जाऊन त्यांना आलिंगन दिले. 

Updated: Jul 20, 2018, 05:03 PM IST
भाजप राहुल गांधींविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार title=

नवी दिल्ली:  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत केलेल्या भाषणानंतर भाजपने त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल यांनी आपल्या भाषणात अनेक खोटे मुद्दे आणि माहिती मांडल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे आता काँग्रेस यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

राहुल गांधी आपल्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ जाऊन त्यांना आलिंगन दिले. यावरुनही वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींची ही कृती औचित्यभंग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याशिवाय, राहुल यांनी भाषणादरम्यान फ्रान्सकडून खरेदी करण्यात येणाऱ्या राफेल विमानांच्या खरेदीचा मुद्दाही उपस्थित केला. या विमानांच्या वाढलेल्या किंमतीबाबत सरकारला प्रश्न विचारायला गेल्यास सरकारकडून भारत आणि फ्रान्स यांच्यातील गोपनीयता कराराचे कारण दिले जाते. मात्र, मी स्वत: जाऊन फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दोन्ही देशांमध्ये असा कोणताही करार झालाच नसल्याचे म्हटले. याचा अर्थ संरक्षणमंत्री निर्मला सितारामन देशवासीयांची दिशाभूल करत आहेत, असे राहुल यांनी म्हटले. यासाठी त्यांच्यावर पंतप्रधान मोदींकडून दबाव आणला गेला, असा आरोपही राहुल यांनी केला. राहुल यांच्या या आरोपानंतर सदनातील भाजप खासदार चांगलेच खवळले होते. त्यांनी संसदेत गोंधळ घालत राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी बोलावे, अशी मागणी केली.