भाजपची शिवसेनेला 'मोठी' ऑफर

२०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. जुना मित्र शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. एका मोठ्या पदाची 'ऑफर' दिल्याची जोरदार चर्चा आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 4, 2018, 12:32 PM IST
भाजपची शिवसेनेला 'मोठी' ऑफर title=

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. अनेक पोट निवडणुकीत भाजपला धक्कादायक  पराभवाला जावे लागले आहे. त्यामुळे भाजपने सावध भूमिका घेण्यास सुरुवात केलेय. भाजपपासून अनेक मित्र पक्ष दूरावत चालले आहेत. त्यामुळे सर्वात जुना मित्र शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचाच भाग म्हणून दुखावलेल्या शिवसेना या आपल्या मित्राला खूश करण्यासाठी राज्यसभेतील एका मोठ्या पदाची 'ऑफर' दिल्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपची नवी सावध चाल

राज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे. गेली ४१ वर्षं हे पद काँग्रेसकडे आहे. पण आता राज्यसभेत अव्वल नंबरचा पक्ष ठरलेल्या भाजपला हे पद विरोधकांकडे जाऊ द्यायचं नाही. हे मानाचं पद शिवसेनेला देण्यास भाजपश्रेष्ठी तयार आहेत. त्यांनी तसा प्रस्ताव 'मातोश्री'वरही कळवला आहे. तो स्वीकारायचा किंवा नाही, याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. त्यांचा होकार किंवा नकार पुढील राजकारणाची दिशा ठरवणारा असल्यानं त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

शिवसेनेकडून हे स्पष्टीकरण

दरम्यान, अशी कोणतीही ऑफर आलेली नाही. तसेच जर अशी काही ऑफर आली तरी ती शिवसेना स्वीकारणार नाही, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे भाजपच्या ऑफरची केवळ राजकीय वर्तुळाच चर्चा असल्याचे म्हटले जात आहे.राज्यसभेत शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. संजय राऊत, वेणुगोपाल धूत आणि अनिल देसाई यांच्यात संजय राऊत सर्वात अनुभवी आहेत. त्यामुळे शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव स्वीकारल्यास या मानाच्या पदावर त्यांची वर्णी लागू शकते, असं बोललं जातंय. मात्र, संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यामुळे शिवसेनेला हे पद नको, असल्याचे स्पष्ट झालेय.

शिवसेनेला भाजपकडून गोंजारण्याचा प्रयत्न

शिवसेना आणि भाजपची जुनी मैत्री होती. मात्र, भाजप-शिवसेनेची युती २०१४ मध्ये संपुष्टात आली होती. केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत शिवसेना सत्तेत आहे, पण त्यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरु आहे.  दोन्हींकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच शिवसेने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी भाजपकडून सातत्याने आम्ही कितीही झाले तरी युती करणार असे सांगण्यात येत आहे. मात्र, शिवसेनेने भाजपचा युतीचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे शिवसेनेची नाराजी कशी दूर करणार यासाठी भाजपकडून चाचपणी करण्यात येत आहे. शिवसेनेला राज्यसभेच्या उपसभापतीपदाची ऑफर देऊन भाजपाने त्यांना आणखी गोंजारण्याचा प्रयत्न केलाय. त्याचाच एक भाग नव्या ऑफरचा असल्याचे म्हटले जात आहे.