रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नावावर २०१४च्या लोकसभा निवडणूकीत जनतेनं भाजपच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. आता २०१९च्या लोकसभा निवडणूकीचे वेध लागले असताना भाजपानं आतापासूनच जोरदार तयारी सुरू केलीये.
पक्षाकडे सध्या मोदींखेरीज दुसरा प्रभावी चेहार नाही. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल. मिशन २०१९ची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या खांद्यावर असेल. भाजपाचे हे चंद्रगुप्त आणि चाणक्य रणसंग्राम गाजवण्यासाठी सज्ज झालेत. याचं पहिलं पाऊल म्हणून पदाधिकारी, राज्यांचे महामंत्री, प्रभारी यांना पंतप्रधानांनी भोजनाचं आमंत्रण दिलं.
मिशन २०१९ फत्ते करण्यासाठी भाजपनं कार्यक्रमाची आखणी केलीये. शुक्रवारी विवेकानंद जयंतीपासून ते २३ जानेवारीला सुभाषचंद्र बोस जयंतीपर्यंत रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलंय. प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवी रक्तदात्यांची यादी तयार केली जाईल. प्रत्येक राज्याला किमान १ लाख रक्तदात्यांचं लक्ष्य देण्यात आलंय. भाजप युवा मोर्चावर या कार्यक्रमाची जबाबदारी असेल.
मन की बातमध्ये पंतप्रधानांनी २१ व्या शतकात जन्माला आलेल्या नवमतदारांचं लोकशाहीत स्वागत केलं होतं. तोच धागा पकडून नवमतदारांना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. त्यासाठी २५ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान मिलेनियम वोटर अभियान आखण्यात आलंय. यात मोबाईल अॅपद्वारे प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे.
नोटबंदी, जीएसटी, वाढती जातीय तेढ आणि बेरोजगारीमुळे तरूणाईमध्ये भाजपबद्दल मत नकारात्मक होत चाललंय. तरूण मतदारांनी पाठ फिरवली तर २०१९ मध्ये सत्ता येणं कठीण आहे, याची भाजपा नेतृत्वाला कल्पना आहे. त्यासाठी 'कॉलेज कनेक्ट'च्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सरकारच्या उपक्रमांसोबत जोडण्यात येईल. 'बूथ कनेक्ट'च्या माध्यमातून प्रत्येक बूथनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांचे गट तयार केले जातील. १४ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीला प्रत्येक जिल्ह्यात तरुणांसाठी समरसता कार्यक्रम घेतला जाणार आहे.
दुसरीकडे हिंदुत्ववादाचा हुकमी पत्ता वापरण्याचीही सिद्धताही भाजपानं केली आहे. त्यासाठी तरूण खासदार महेश गिरी लवकरच लाल किल्ल्यासमोर एक मोठा यज्ञ करणार आहेत. या वेळीच निवडणूकीचं रणशिंग फुंकलं जाईल.