निवडणूकीपूर्वीच भाजपाचे शक्तीप्रदर्शन; पश्चिम बंगालमध्ये ३१० रथयात्रा

लोकसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपाकडून ४२ पैकी २२ जागांचे लक्ष्य

Updated: Jan 25, 2019, 11:49 AM IST
निवडणूकीपूर्वीच भाजपाचे शक्तीप्रदर्शन; पश्चिम बंगालमध्ये ३१० रथयात्रा title=

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये वर्चस्व वाढवण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात जवळपास ३१० रॅलींचे आयोजन करणार आहे. भारत राजकारणात पश्चिम बंगालला सर्वात अधिक प्राथमिकता दिली जाते. त्याच धर्तीवर लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून ४२ पैकी २२ जागांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. राज्यात भाजपाकडे दोन जागा आहेत. भाजपा आणि सत्ताधारी टीएमसी राज्यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या सुत्रांनी 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला आव्हान देण्यासाठी भाजपा ३१० रॅलींचे आयोजन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपाच्या रथयात्रेसाठी परवानगी न दिल्याचा आरोप केला होता. पश्चिम बंगालमधील मालदा येथे एका रॅलीला संबोधित करताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी 'ममता बॅनर्जी घाबरल्यामुळे आम्हाला रथ यात्रेसाठी परवानगी नाकारली' असल्याचे व्यक्तव्य केले होते. 

अमित शाह यांनी 'तुम्ही आम्हाला रथयात्रेसाठी परवानगी नाकारली तर आम्ही रॅली काढू, बैठका घेऊ. तुम्ही आम्हाला बंगालमध्ये येण्यापासून थांबवू शकत नाही. जितके तुम्ही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न कराल, तितके बंगालमध्ये कमळ उमलणार' असल्याचे त्यांनी स्पष्ट करत ममता बॅनर्जीना खुले आव्हानच दिले आहे. 

येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सर्वच पक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून पक्षांच्या पक्षश्रेष्ठींमध्येही चढाओढ पाहायला मिळत आहे.