लोकसभा निवडणुकीत भाजपला १२५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत- ममता बॅनर्जी

भाजपला मृत्यूघंटेचे स्वर ऐकू येऊ लागले आहेत.

Updated: Jan 17, 2019, 08:08 PM IST
लोकसभा निवडणुकीत भाजपला १२५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत- ममता बॅनर्जी title=

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सव्वाशेपेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. त्या गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी अमित शहा यांच्या रथयात्रेच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, कोलकाता येथील विरोधी पक्षांच्या सभेमुळे भाजपला मृत्यूघंटेचे स्वर ऐकू येऊ लागले आहेत. आपल्याला लोकसभा निवडणुकीत १२५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, याची त्यांना जाणीव झाली आहे. विरोधकांची एकी ही आगामी निवडणुकीत निर्णायक घटक ठरेल, असे ममता यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्याची भाजपची मागणी फेटाळली होती. अशा स्वरुपाच्या रथयात्रेमुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. त्याचवेळी भाजपने रथयात्रेऐवजी राज्यामध्ये बैठका आणि सभा घ्यावात, असे न्यायालयाने म्हटले आहे. अर्थात त्यासाठी आधी राज्य सरकारची परवानगी घ्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. 

पश्चिम बंगालमधील रथयात्रेचा मुद्दा भाजपने प्रतिष्ठेचा केला होता. रथयात्रेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी कोलकाता उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने रथयात्रेला परवानगी दिली होती. अशा प्रकारे रथयात्रेला परवानगी नाकारणे योग्य नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. या निकालानंतर लगेचच पश्चिम बंगालमधील राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाकडे याचिका दाखल केली. दोन सदस्यीय खंडपीठाने आधीचा निकाल रद्दबातल ठरवत रथयात्रेला परवानगी नाकारली होती. रथयात्रेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणे कठीण होईल. त्याचबरोबर सामाजिक सलोखा बिघडेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. याच निकालाविरोधात भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.