मुंबई: जगभरात कोरोना विरुद्ध लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. भारतात लसीकरणावर जास्त भर दिला आहे. बऱ्यापैकी लोकांचा पहिला डोस झाला आहे. तर 45 वर्षाहून अधिक लोकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे. मात्र डेल्टा आणि डेल्टा प्लसचा वाढता धोका लक्षात घेता तिसरा बुस्टर डोस घ्यायचा की नाही? तो कोणी घ्यावा कधी घ्यायचा असे अनेक प्रश्न सध्या समोर आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) युरोप शाखेच्या प्रमुखांनी पहिल्यांदाच याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. युरोप शाखेचे प्रमुख देखील अमेरिकेतील तज्ज्ञांच्या म्हणण्याशी सहमत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये लसीचा तिसरा डोस हा संरक्षणासाठी मदत करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरा डोस हा अतिसंवेदनशील लोकांनी घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी कोव्हिशिल्ड लस तयार करणाऱ्या पुनवाला यांनी यासंदर्भात एक विधान केलं होतं. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी दोन डोस केवळ गरजेचे नाहीत तर 6 महिन्यांनी बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे. त्यामुऴे पुन्हा एकदा हाच प्रश्न आहे की बुस्टर डोस कोणी आणि कधी घ्यायचा आहे.
कोरोनाचा संक्रमणाचा धोका अजून टळलेला नाही. परिस्थिती काही देशांमध्ये चिंताजनक आहे. 53 पैकी 33 देशांमध्ये एका आठवड्यात कोरोनाचे 10 टक्के किंवा त्याहून अधिक कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत असा दावा डॉ. हंस क्लुगे यांनी केला आहे.
क्लुगे यांच्या म्हणण्यानुसार ज्यांची प्रकृती नाजूक किंवा लगेच आजारी पडण्यासारखी आहे ज्यांना पटकन संसर्ग होऊ शकतो अशा सर्व लोकांनी लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं आहे. गेल्या काही महिन्यांपासून बुस्टर डोसची चर्चा होत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणीही शिक्कामोर्तब केलेला नाही. दोन डोस झालेल्या लोकांना बुस्टरची गरज आहे की नाही असा प्रश्न अजूनही आहे.