नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये निर्माण धालेली परिस्थिती बुधवारी विकोपास गेल्याचं पाहायला मिळालं. ज्यावेळी भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं वृत्त समोर आलं तेव्हा केंद्र सरकार, सैन्यदलासोबत देशाच्या नागरिकांमध्ये प्रचंड निराशा आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. मिग २१ चे वैमानिक, विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात असल्यामुळे आता त्यांना परत आणण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
सोशल मीडियावर विंग कमांडर वर्थमान यांचे फोटो व्हायरल करणाऱ्या पाकिस्तानला भारताकडून खडसावण्यातही आलं आहे. पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचे जखमी अवस्थेतील फोटो पोस्ट करण्यात येण्याच्या कृत्याची भारताकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानला पुन्हा एकदा जिनिव्हा करारातील तरतुदींची आठवण करुन देत भारतीय जवानाला त्यांनी एका सैनिकाप्रमाणेच वागणूक देत भारताकडे परत करावं या मागणीनेही जोर धरला आहे.
ताब्यात घेतलेल्या वैमानिकाला परत करा अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे करत पाकिस्तानचे भारतातील उप-उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना समन्स बजावलं होतं. यावेळी वैमानिकाला ताब्यात घेतल्याबद्दल भारताने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. वैमानिकाचा अमानुष व्हिडिओ दाखवल्याचाही यावेळी कठोर शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आलाय. वैमानिकाला कुठलीही इजा होता कामा नये असं भारताने पाकिस्तानला खडसावलं.
फक्त केंद्राकडूनच नव्हे तर देशातील सर्वच राजकीय पक्षांकडून ही मागणी करण्यात येत आहे. भारतीय सैन्यातील पाकिस्तानच्या ताब्यात असणारे विंग कमांडर परत येईपर्यंत पंतप्रधान मोदींनी सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करावेत अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. #BringBackAbhinandan या हॅशटॅगने सोशल मीडियावरही अनेकांनीच त्यांना परत करण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. भारतीय वैमानिकाला पाकिस्तानच्या तावडीतून सोडवा अशी मागणी करणारे ट्विट्स आणि पोस्ट दर क्षणाला वाढत चालले असून, सर्वत्र चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.