Man vs Wild फेम बेअर ग्रिल्सने १४ फेब्रुवारीला जिम कॉर्बेटमध्ये घेतली होती मोदींची भेट?

या भेटीमागचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट

Updated: Mar 10, 2019, 01:40 PM IST
Man vs Wild फेम बेअर ग्रिल्सने १४ फेब्रुवारीला जिम कॉर्बेटमध्ये घेतली होती मोदींची भेट? title=

मुंबई : काही कार्यक्रम हे मालिकांच्या धाटणीतील नसले तरीही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतातच. अशाच एका कार्यक्रमामुळे घरोघरी पोहोचलेला चेहरा म्हणजे मॅन व्हर्सेस वाईल्ड फेम बेअर ग्रिल्स या टीव्ही स्टारचा. जंगल, वाळवंट, खारफुटीची झाडी, किंवा वर्षावनं. प्रत्येक ठिकाणी अडकल्यानंतर कशा प्रकारे जीव वाचवायचा याची शिकवण देणारा हा बेअर चक्क भारतात आला होता...... बसला ना तुम्हालाही धक्का? त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळेच याबाबतचा खुलासा झाला होता. 

इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बेअरने एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने भारतात येण्याचा आनंद व्यक्त करत लिहिलेलं, ‘आज भारतात खूपच चांगला दिवस आहे. मी तिथे लवकरच येणार आहे... काहीतरी भन्नाट चित्रीकरण करण्यासाठी...’. असं लिहित त्याने ही पोस्ट प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीच्या दिवशी केली होती. बेअरची ही पोस्ट कालांतराने डिलीट करण्यात आली. ही पोस्ट डिलीट करण्यामागचं कारणंही तसंच होतं. 

14 फेब्रुवारी म्हणजेच ज्या दिवशी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे हल्ला झाला तेव्हा बेअर उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट येथील धीकला या भागात होता. त्याच्या एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठीच तो भारतात आला होता. त्याच दिवशी सर्वसामान्य पर्यटकांसाठी जिम कॉर्बेटमध्ये प्रवेश निषिद्ध ठेवण्यात आला होता. कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा त्याच ठिकाणी येणं अपेक्षित होतं. 

बेअरचं येणं, योगायोगाने पंतप्रधानांचं तिथे असणं या सर्व गोष्टी काहीतरी भन्नाट प्रकल्पाकडेच लक्ष वेधतात. पण, बेअरच्या युनायडेट किंग्डम येथील कार्यालयातून मात्र याविषयीची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. किंबहुना भारतात त्याच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या चित्रीकरणाची बाबही त्यांनी नाकारली. तर उत्तराखंडच्या वन खात्याकडूनही जिम कॉर्बेटमध्ये कोणत्याही प्रकारचं चित्रीकरण झाल्याच्या चर्चांना दुजोरा देण्यात आला नाही. इथे लक्ष देण्याजोगी बाब अशी की, वनअधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्या भागात चित्रीकरण करता येत नाही. 
बेअर भारतात आल्याचे अनेक पुरावेही सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाले. मग ते त्याच्या चाहत्यांनी पोस्ट केलेला एखादा सेल्फी असो किंवा खुद्द बेअरचीच एखादी पोस्ट असो. 

दिल्लीतील भारत स्काऊट्स ऍण्ड गाईड्सच्या अधिकाऱ्यांना याविषयी विचारलं असता तो भारतात आल्याची माहिती अखेर डॉ. के.के. खंडेलवाल यांनी दिली. ‘पंतप्रधानांच्या बोलावण्यावरुन तो भारता आला होता. वैश्विक स्काऊट मोहिमेचा चेहरा असणाऱ्या बेअरने बीएसजीच्याच एका कार्यक्रमात सहभागही घेतला. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्याने या कार्यक्रमात सहभागी होत काही युवा स्काऊट्सची भेट घेतली. हा कार्यक्रम दिल्लीतील कार्यालयाऐवजी वेळ वाचवण्याच्या उद्देशाने विमानतळाजवळ आयोजित करण्यात आला होता’, अशी माहिती त्यांनी दिली. 

बेअरचं भारतात येणं, पंतप्रधानांचं त्याच ठिकाणी असणं हा केवळ योगायोग नसला तर बराक ओबामा यांच्यासोबत ज्याप्रमाणे त्याच्या एका कार्यक्रमाच्या खास भागाचं चित्रीकरण केलं होतं, तसंच चित्रीकरण त्याने मोदींसोबत केलं असावं अशा चर्चा सध्या अनेक वर्तुळांमध्ये रंगू लागल्या आहेत. या चर्चांची अधिकृत माहिती मात्र अद्यापही कोणाकडून समोर आलेली नाही. त्यामुळे नेमकं या भेटीमागचं कारण आहे तरी काय, हाच प्रश्न राहून राहून अनेकांच्या मनात घर करत आहे.